जयपूरः राजस्थान विधानसभेत आज वेगळाच प्रसंग घडला. त्यामुळे विरोधी पक्षातील आमदार अक्षरशः पोट धरून हसू लागले. या साऱ्या प्रकारात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची बरीच नामुष्की झाली. त्यापायी विधानसभेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूबही करावे लागले. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना एक मोठ्ठी चूक केली आहे. त्यांची चक्क जुना अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली. बराच वेळ हा प्रकार सुरु राहिला. सुरुवातीला कोणाच्याही लक्षात हा प्रकार आला नाही. अखेर सात ते आठ मिनिटांचा कालावधी उलटून गेल्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात हा प्रकार आला. ते पोट धरून हसू लागले. सभागृहात एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी भाषण थांबवले (Gehlot reads old budget for seven minutes). गोंधळामुळे कामकाज अर्धा तास तहकूब झाले.
त्याचे झाले असे की विधानसभेत मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पाची जी प्रत सोपवण्यात आली होती, त्यात काही पाने जुनीच होती. त्यामुळे हा प्रकार घडला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या चुकीसाठी सभागृहाची माफी मागितली आहे. मात्र, विरोधी पक्षातील नेत्यांनी गोंधळ केला. देशाच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्प सादर करताना सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. या प्रकारास अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर आता कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.