पुणेः पुण्यात चिंचवड मतदारसंघात शिवसेना नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. या बंडखोरीचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची भेट घेऊन त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. कलाटे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता कलाटे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. लोकभावना माझ्यासोबत असून लोकांच्या भावनांना तडा जाऊ देणार नाही (Chinchwad By Poll Candidate Rahul Kalate), असा निर्धार व्यक्त करीत त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात राहण्याचे संकेत दिले आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासंदर्भात कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी थेट ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर पुण्यात दाखल झाले. त्यांची आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर राहुल कलाटे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, आता कलाटे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. कलाटे म्हणाले की, “वेगवेगळ्या भागातून लोकांचे मला फोन येत आहेत. राहुल, तू कुठल्याही परिस्थितीत लढ, आम्ही तुझ्यासोबत आहोत, असे आश्वासन ते देत आहेत. त्यामुळे ही लोकभावना रोखण्याचे काम मी करणार नाही. कारण या लोकांनी वेळोवेळी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. ही जनभावना मी दुखावणार नाही” असेही ते म्हणाले.