लुपिन लिमिटेडमधील पदे भरणार : ९५ विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती
नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व प्रशिक्षण सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. या रोजगार व प्रशिक्षण सेल मार्फत विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू आयोजित केले जात आहे. या उपक्रमाद्वारे विद्यापीठातील विविध विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगाराचे दालन खुले होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मिहान येथील लुपिन लिमिटेड कंपनीच्या वतीने कॅम्पस इंटरव्यू घेण्यात आले. क्वालिटी ॲनालिसिस व क्वालिटी चेक आदी पदांकरिता शनिवारr २९ एप्रिलला घेण्यात आलेल्या मुलाखतीला ९५ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुभाष चौधरी यांनीही प्रत्यक्ष भेट देत कंपनी व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
शिक्षण पूर्ण होताच नोकरी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा देखील कॅम्पस इंटरव्यूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या सोबत लुपिन लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक किरण देशमुख, महाव्यवस्थापक (एचआर) विजयकुमार टाटा, विद्यापीठाचे इनक्युबॅशन केंद्राचे संचालक डॉ. अभय देशमुख, विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, कंपनीचे एचआर विभागातील प्रफुल्ल काशीकर, अमन गुप्ता, उमेश चंद्रा भूषण पाटील आदी उपस्थित होते. लुपिन लिमिटेड कंपनीकडून बीफार्म आणि बीएससी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही मुलाखतीची प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना शिकतानाच नोकऱ्या मिळाव्यात यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. कंपन्यांसोबत पदभरतीबाबत चर्चा केली जात आहे. त्यासाठी विशेष सेल देखील कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचे चांगले परिणाम देखील दिसून येत आहेत. शिकतानाच नोकऱ्यांची निश्चिती होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील आशेचा किरण निर्माण झाला आहे. नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थीसुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्याच्यात मोठी स्पर्धा दिसून येते आहे. सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नसले तरी या निमित्ताने मुलाखतींची तयारी होत असल्याचे विद्यार्थी सांगतात.