आंदोलन आटोपले मात्र ‘ते’ परतलेच नाही

0

कुटुंबीयांच्या जीवाला घोर

गडचिरोली. स्वस्तः धान्य दुकानदार संघटनेकडून मार्च महिन्यात राजधानी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुका मुख्यालयापासून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या गाहणेगाटा येथील स्वस्त धान्य दुकानदार संताराम बुधराम पोरेटी (४६) हेसुद्धा गेले होते. अन्य सर्व आंदोलक स्वगृही परतले. मात्र, सव्वा महिन्याचा काळ लोटूनही संताराम परतलेच नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. दिल्लीतच पोलिसांत ते हरविल्याची तक्रारही नोंदविण्यात आली. पण, त्याचाही कोणताच परिणाम झाला नाही. पोरेटी कुटुंब दिल्ली पोलिसांना फोन करून विचारणा करतात. त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगितले जाते. अधूनमधून पोलिसही फोन करून संताराम घरी आले काय याबाबत विचारणा करतात. आता त्यांचा शोध घेण्यासाठी पुन्हा काही जणांना दिल्लीला पाठविण्याची तयारी संघटनेकडून केली जात आहे.
बेपत्ता असणारे संताराम हे तालुक्यातील अन्य 11 स्वस्त धान्य दुकानदारांसोबत 20 मार्चला दिल्लीला गेले होते. सर्वजण दिल्लीत पोहोचल्यानंतर एकत्रित दिल्लीतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर सर्वजण आंदोलनस्थळी पोहोचले. नेमके याच दरम्यान संताराम पोरेटी हे बेपत्ता झाले. सर्वांनी मिळून त्यांचा शोधही घेतला. पण, त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर दिल्लीच्या नंदीग्राम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पण, त्यांच्याबद्दल काहीच सुगावा लागत नसल्याने कुटुंब चिंतेत पडले आहेत. ते सुखरून असून घरी परत येतील, असा पोरेटी कुटुंबाला विश्वास आहे. पोरेटी यांचे आई- वडील, दोन भाऊ, पत्नी, मुले असे संयुक्त कुटुंब आहे. यापूर्वी देखील ते दिल्लीला जाणार होते. मात्र, त्यांच्या कुटुंबाने विरोध केला होता. अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान आहे. संताराम परत आले नसल्याने दुकानाची जबाबदारी पत्नी सुगंधाला सांभाळावी लागत आहे. मुलगी वैशाली (१९) नीटच्या परीक्षेसाठी नांदेडला गेली आहे. वडील परत न आल्याने तीसुद्धा चिंतित आहे. मुलगा ओम (१६) हा लाखनी सैनिक शाळेतून सुट्टी घेऊन परत आला.