लष्कराच्या तोफखान्यात प्रथमच महिला अधिकाऱ्यांना संधी

0

नवी दिल्लीः संरक्षण दलांमध्ये महिला अधिकारी आता विविध पदांवर कार्यरत असताना आता लष्कराच्या तोफखान्यातही प्रथमच महिला अधिकाऱ्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी देण्यात आली आहे. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पाच महिला अधिकाऱ्यांच्या एका तुकडीला तोफखाना रेजिमेंटमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. ( women officers in Artillery regiment). या पाच महिला अधिकार्‍यांपैकी तीन महिला अधिकारी उत्तरेकडील सीमेवर तैनात केलेल्या तुकड्यांमध्ये तर इतर दोन पश्चिमेकडे रेजिमेंटमध्ये त्यांना तैनात करण्यात येणार आहे.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी काही महिन्यांपूर्वी लष्कराच्या तोफखान्यात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला होता. संरक्षण मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या निर्णयानंतर प्रथमच तोफखान्यात महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलिकच्या काही वर्षात संरक्षण दलातील अनेक विभागांमध्ये महिला अधिकाऱ्यांना संधी मिळत आहे. गेल्यावर्षी वायुसेनेत महिला अधिकाऱ्यांना लढाऊ विमानाच्या वैमानिक म्हणून संधी देण्यात आली आहे.