मुंबई: स्टिंग ऑपरेशनमध्ये केलेली अत्यंत वादग्रस्त वक्तव्ये उघड झाल्यावर अडचणीत आलेले बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अखेर अध्यक्षपदाचा (Chetan Sharma Resigned as Chief Selector ) राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी केलेल्या दाव्यांमुळे बीसीसीआयपुढे प्रश्नचिन्ह उभे झाले होते. शर्मा यांची गेल्या महिन्यातच वरिष्ठ निवड समितीचे मुख्य निवडकर्ता म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय खेळाडूंच्या फिटनेसबाबत अनेक दावे केले होते. अनेक भारतीय क्रिकेट खेळाडू संपूर्ण तंदुरुस्तीसाठी सामन्यांपूर्वी इंजेक्शन घेतात जी वेदनाशामक किंवा वैद्यकीय संघाने दिलेली नसतात, असा खळबळजनक दावा शर्मा यांनी केला होता.
खेळाडू एंशी टक्के तंदुरुस्त असतानाही इंजेक्शन्स घेतली जातात आणि शंभर टक्के तंदुरुस्त होतात. या इंजेक्शन्समधील औषधी डोप टेस्टमध्ये पकडले जात नाही, असा दावाही त्यांनी केला होता. चेतन शर्मा यांनी विराट कोहली आणि राहुल द्रविड यांच्याशी संबंधित पर्सनल गोष्टीही शेअर केल्या आहेत. तसेच विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वादावरही मोठे विधान केले आहे.माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यामध्ये अहंकाराची लढाई होती, असे शर्मा म्हणाले होते. कोहली कॅप्टनशिपच्या वादात खोटे बोलला होता, असाही त्यांचा दावा होता.
रोहित शर्माला आराम देण्याच्या बहाण्याने त्याचा टी-20 मधून पत्ता कट करण्यात येईल, असं वक्तव्य चेतन शर्मा यांनी केलं आहे. टी-ट्वेंटीमध्ये शुभमन आणि इतर खेळाडूंना संधी मिळावी, म्हणून रोहित विराटला विश्रांती दिली जात आहे. हार्दिक हा दिर्घकाळ टीम इंडियाची धुरा सांभाळेल. त्यामुळे रोहित यापुढे टी-20 संघात दिसणार नाही, असं चेतन शर्मा म्हणाले आहेत.विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कोणताही वाद नाही किंवा भांडण नाही. फक्त दोघांचा अहंकार आडवा येतोय. ते दोघंही फिल्म स्टार सारखे आहेत. अमिताभ आणि धर्मेंद्र सारखे, असंही चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटलं आहे.