छत्रपती संभाजीनगरातील घटनेला राजकीय रंग नको-फडणवीस

0

नागपूर: छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही लोक याठिकाणी भडकाऊ प्रतिक्रिया देत असून परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याच्या आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केला. नेत्यांनी कसे वागले पाहिजे, हे समजावून घ्यावे. कोणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नयेत, ही जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. तसेच या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. काही जण चुकीचे बोलत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या परिस्थिती निंयत्रणात आहे. परंतु शांतता पाळण्याचा प्रयत्न सर्वांना करावा लागेल. शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असेही फडणीस म्हणाले.

चंद्रकांत खैरेंचा आरोप

दरम्यान, ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणी भाजप आणि देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री भागवत कराड आणि इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले आहेत. खैरे म्हणाले की, हे सगळे दोस्त आहेत. महानगर पालिका, विधानसभा- लोकसभा, जिल्हापरिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणूकासाठी हा गेम केला जात आहे. हे भागवत कराड आणि इम्तियाज जलील या दोघांचे हे प्लॅनिंग असून देवेंद्र फडणवीस यात मुख्य आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कालच्या घटनेचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काही फरक पडेल का याबद्दल विचारले असात खैरे म्हणाले की याचा अजिबात फरक पडणार नाही. इतके मराठवाड्याचे लोक येतील की ते पाहूनच लोक पळून जातील, असा दावा खैरे यांनी केलाय.

मुद्दाम दंगली घडविल्या जाताहेत का? -अजित पवार

दरम्यान, राज्यात जाणीवपूर्वक दंगली घडविल्या जात आहेत का, असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केलाय. दंगली मागचा मास्टरमाइंड शोधून काढा, असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.