छत्रपती संभाजीनगरात दोन गटात तणाव, पोलिसांवर दगडफेक

0

छत्रपती संभाजीनगर: रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात (Communal Riot in Chhatrapati Sambhaji Nagar) दोन गटात संघर्ष झाला आहे. स्थानिक किराडपुऱ्यात राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद होऊन दोन्ही गटांमध्ये जोरदार संघर्ष झाला. अनियंत्रित झालेल्या गटाने पोलिसांवरही हल्ला केला व पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले. या संघर्षात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून दंगलखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सुरु झालेला हा संघर्ष पहाटेच्या सुमारास आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले. शहराच्या मिश्र लोकवस्तीत असलेल्या किराडपुऱ्यातील राम मंदिरात राम नवमीची जय्यत तयारी सुरू होती. रात्री साडेअकराच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होता. येथेच तणावाची पहिली ठिणगी पेटली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला व शिवीगाळ सुरू होऊन दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. काही क्षणातच एका गटाने मंदिराच्या दिशेने दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी काही लोक मंदिरात घुसले. त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वाढीव बंदोबस्त मागवला

मात्र ते येईपर्यंत जाळपोळ सुरू झाली होती. मंदिरासमोर उभे असलेले पोलिसांचे वाहन दंगेखोरांनी जाळले. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी काही धर्मगुरुंना बोलावण्यात आले. पण जमाव त्यांचेही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. काही वेळात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मात्र दंगेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवले. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडला. नंतर अग्निशमन विभागाच्या गाड्यांमधून पाण्याचा मारा करण्यात आला. स्थानिकांच्या माहितीनुसार, जमाव हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. हा गोळीबार दोन तीन वेळा ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलिस रस्ता पोलिसांनी बंद केला. त्याशिवाय बहुतांश नागरिकांच्या घरावर दगडफेक झाली. तेथील लोकांना घराबाहेर येण्यासाठी नागरिक उद्युक्त करत होेते. दरम्यान, लोकांनी शांतता बाळगण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा