नागपूर : रेशीमबाग येथील कल्याण मूकबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी मेट्रो भवनला भेट दिली. विद्यार्थ्यांना महामेट्रोचे कामकाज, मेट्रो ट्रेनचे संचालन, व्यवस्थापन आदींची माहिती देण्यात आली. मेट्रो अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांनी सांकेतिक भाषेत मेट्रोच्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे अधीकाऱ्यांद्वारा निरसन करण्यात आले. सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांची टीम मेट्रो भवनात पोहोचली. मेट्रो भवनची इमारत पाहून मुलांना खूप आनंद झाला. यावेळी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी महामेट्रोच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.
• रूट मॅप पाहून टाळ्या वाजवल्या
मेट्रो भवनच्या तळमजल्यावरील नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा नकाशा ही मुले अतिशय काळजीपूर्वक पाहत होती. नागपूरच्या चारही दिशांना धावणाऱ्या मेट्रो स्थानकांची आणि मार्गांची माहिती नकाशात देण्यात आली आहे. प्रजापती नगर स्टेशन पाहून विद्यार्थी धनंजय पांडे टाळ्या वाजवू लागला. त्याची उत्सुकता पाहून इतर विद्यार्थीही पोहोचले. शिक्षक श्री. अजित नाडरवानी यांना धनंजयचे बोलणे समजले आणि धनंजयचे घर पारडी येथे असल्याचे सांगितले आणि नकाशावर स्टेशन पाहून हे माझे स्टेशन आहे असे सांगून टाळ्या वाजवल्या.
• सांकेतिक भाषेत चर्चा
मेट्रो भवनच्या निरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत एकमेकांशी चर्चा केली. शिक्षिका सौ.विद्या सासने, शिक्षक श्री. सचिन पवार यांनी मुलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन केले. मुलांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या स्थानकांच्या प्रतिकृती, वाचनालय, इको हॉलला भेट दिली. महा मेट्रोच्या कंट्रोल रूमच्या स्क्रीनवर चारही दिशांना धावणाऱ्या मेट्रो ट्रेनची माहितीही शिक्षकांनी मुलांना दिली. मेट्रो भवनच्या गॅलरीमध्ये पुणे मेट्रो स्थानकाच्या इमारतींची प्रतिकृती, भूमिगत मेट्रो मार्ग, निओ मेट्रोची माहिती शिक्षकांकडून मुलांना देण्यात आली. सौरऊर्जा प्रणालीद्वारे अतिरिक्त विजेची व्यवस्था करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे या उद्देशाने ग्रीन मेट्रो अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. मेट्रो भवनची हिरवळ पाहून मुलांना खूप आनंद झाला. सुमारे 2 तास विद्यार्थ्यांनी मेट्रो भवनाचे निरीक्षण करून नागपूर मेट्रो ‘माझी मेट्रो’ची ओळख करून घेतली.