नागपूर (nagpur) ता ८:नागपूर महानगरपालिका व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता: ८) “मुख्यमंत्री वयोश्री योजना” (“Chief Minister Vyoshree Yojana”) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेला आशा सेविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. यावेळी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी (Dr. Abhijeet Chaudhary)यांच्या निर्देशानुसार आशा सेविकांना “मुख्यमंत्री वयोश्री योजनेची इत्थंभूत माहिती देण्यात आली.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यशाळेत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, समाज कल्याण विशेष अधिकारी श्रीमती अंजली चिवंडे, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती निलीमा मून प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी शहरात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. सेलोकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या “राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या” धर्तीवर राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. सर्व पात्र लाभार्थ्याना योजनेचा लाभ मिळावा याकरिता आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाची संपूर्ण यत्रंणा कार्यरत आहे. आशा सेविका देखील या योजनेचा महत्वाचा भाग असून, ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून, आशा सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ६५ वर्षावरील नागरिकांना योजनेची माहिती देत, त्यांची नोंदणी व्हावी याकरिता प्रयत्न करावे असे डॉ. सेलोकर यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रत्येक आशा यांना ५० फॉर्म देण्यात येणार आहे. ते फॉर्म लाभार्थी यांना देणार आहेत. नंतर लाभार्थी प्रत्येक बुधवारी होणाऱ्या शिबिरात अर्ज सादर करतील. मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक बुधवारी नोंदणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली असून, वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ज्येष्ठांची आरोग्य तपासणी करण्याकरीता शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिरात प्राप्त अर्ज हे नंतर समाज कल्याण विभागाला वर्ग केले जाणार असल्याचेही डॉ. सेलोकर यांनी सांगितले.
तर समाज कल्याण विशेष अधिकारी श्रीमती अंजली चिवंडे यांनी आपल्या संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून योजनेची इत्थंभूत माहिती सदर केली, तर समाज कल्याण निरीक्षक श्रीमती निलीमा मून यांनी आशा सेविकांच्या शंकांचे निराकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सिल्विया मोरडे यांनी केले.