चिखलदरा पर्यटन महोत्सव उठला वन्यप्राण्यांच्या जीवावर; कारच्या धडकेत बिबट्या ठार

0

अमरावती, 16 जुलै : विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यातील वन्य प्राणी आणि जैवविविधतेची ख्याती जगभर जाऊन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन विभागाच्यावतीने शनिवार आणि रविवार या दोन दिवशी चिखलदरा मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ढिसाळ नियोजन, बेशिस्त वाहतूक आणि अधिकाऱ्यांमधील असमन्वयामुळे महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका कारच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पर्यटन विभागाच्या वतीने १५ आणि १६ जुलै रोजी चिखलदरा येथे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके आणि पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांनी दिली होती. मात्र अधिकाऱ्यांमधला असमन्वय अनियंत्रित, बेशिस्त वाहतूक आणि ढिसाळ नियोजनाचा फटका येथील वन्य प्राण्यांना बसला आहे. आज पहिल्याच दिवशी एका भरधाव कारच्या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

चिखलदऱ्याची ख्याती जगभर पसरून पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी हा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आयोजन करत असताना विविध विभागांमध्ये समन्वय व नियोजन असणं अपेक्षित होतं. मात्र नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या पर्यटन विभागाने कुठलेही नियोजन आणि कार्यक्रमाची पुरेशी प्रचार प्रसिद्धी अन् जनजागृती न करता हा कार्यक्रम पुढे रेटला.

चिखलदरा येथे जाण्यासाठी परतवाड्यावरून एकेरी रस्ता आहे. त्यामुळे धामणगाव गढी नाक्यावर वेग प्रतिबंधित फलक ठिकठिकाणी लावणं अपेक्षित होतं. वेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी काही पथकांची नियुक्ती करणं अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे परतवाडा ते चिखलदरा मार्गावर अनेक वन्य प्राण्यांचे झोन आहेत. ज्यामध्ये बिबटे, हरीण, गवा अशा प्राण्यांचा समावेश आहे.

वन्यप्राण्यांच्या झोनमधून पर्यटकांनी प्रवेश करत असताना त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने वनविभाग आणि इतर विभागांच्या मदतीने ॲनिमल सिक्युरिटी पॉइंट उभारणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे चिखलदरा पर्यटन महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांना येण्याचा व जाण्याचा मार्ग वेगळा करणे अपेक्षित होते. मात्र पर्यटन विभाग, वनविभाग नगरपालिका आणि इतर संबंधित विभागांच्या वतीने समन्वय साधून वरील प्रकारे कुठलीही ठोस यंत्रणा राबविण्यात आली नाही. त्यामुळे एका निष्पाप बिबट्याचा जीव गेल्याची भावना स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी चिखलदऱ्याचे वाळके यांना फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही.