
नवी दिल्ली, 2 जुलै : एनटीपीसी (NTPC) लिमिटेड, अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, या भारतातील आघाडीच्या एकात्मिक ऊर्जा उत्पादक कंपनीने मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील कोळसा उत्पादनाच्या तुलनेत, 2023- 2024 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, आपल्या कॅप्टिव्ह खाणींमधील कोळसा उत्पादनात जवळपास दुप्पट वाढ नोंदवली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 8.48 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) इतकी कोळसा उत्पादनाची विक्रमी पातळी नोंदवली असून, आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत ते 4.27 मेट्रिक टन (MMT) इतके होते.
त्याशिवाय, 2022-2023 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2023-2024 च्या पहिल्या तिमाहीत कोळसा पाठवण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत एकूण 8.82 मेट्रिक टन (MMT) कोळसा पाठवण्यात आला असून, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत यामध्ये 112% इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
कोळसा उत्पादनात सातत्यपूर्ण वाढ व्हावी, यासाठी एनटीपीसी ने अनेक धोरणे आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. यामध्ये कठोर सुरक्षा उपायांचा अवलंब, सुधारित खाण नियोजन, उपकरणांचे ऑटोमेशन, कर्मचारी प्रशिक्षण आणि सतत देखरेख आणि विश्लेषण प्रणालीची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. या उपक्रमांनी परिचालन अनुकूल करण्यात, उत्पादकता वाढवण्यात आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कोळसा उत्पादन आणि त्याच्या पाठवणीमधील वाढ हे एनटीपीसीचे परिचालनामधील उत्कृष्टतेसाठीचे समर्पण आणि भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यामधील योगदानाचा दाखला आहे. आपली कामगिरी आणखी सुधारण्यासाठी आणि देशाच्या ऊर्जा पूर्तीच्या उद्दिष्टांना पाठबळ देण्यासाठी, नवोन्मेषी तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब सुरु ठेवण्याचे कंपनीचे धोरण आहे.