राज्यात थंडीची चाहुल पण विदर्भात पावसाच्या सरी, पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता

0

मुंबई, 04 जानेवारी : राज्यातमागच्या काही दिवसांपासून थंडीची चाहुल लागल्याने बऱ्याच जिल्ह्यात थंडी पडली होती. दरम्यान किमान तापमानात घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी नागपूर आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. यामुळे किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपूरमध्ये आज(दि. 04) पहाटे पासून ढगाळ वातावरण आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील अनेक ठिकाणी पारा घसरला आहे. यामुळे नागपूरकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळत आहे. ढगाळ वातावरण आणि पारा घासरल्याने अनेक भागात धुके सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याचं चित्र आहे. मुंबई, पुणे, नाशिक,कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात कमालीची घसरण बघायला मिळाली आहे. तरी नवीन वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात हुडहूडी भरणारी थंडी जाणवली. हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तरी येणारे पुढील दोन आठवडे थंडीचा जोर कायम असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये अचानक थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान मागच्या 24 तासात पुणे 32.1 (12.5), जळगाव 29 (9.8), धुळे 28 (7.8), कोल्हापूर 30.6 (19.5), महाबळेश्वर 28.7 (14.1), नाशिक 30.2(10.6), निफाड 27.4 (8.4), सांगली 31 (18.1), सातारा 31.6 (14.9), सोलापूर 33.7 (20.1), सांताक्रूझ 32.4 (16.6), डहाणू 28.3 (16), रत्नागिरी 31.7 (19.1), औरंगाबाद 30(10.6), नांदेड 30.8 (17.8), उस्मानाबाद – (15), परभणी 30.7(17), अकोला 30.8 (14.9), अमरावती 31 (14.03), बुलडाणा 29 (14.5), ब्रह्मपुरी 29.8 (15.2), चंद्रपूर 28.2 (17.4), गडचिरोली 29 (13), गोंदिया 28 (12.1), नागपूर 28.4 (13.2), वर्धा 28.2 (14.5), यवतमाळ 28.5 (16.0) तापमानाची नोंद झाली.