पोलिसांचे शहरभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू

0

40 ठिकाणी नाकाबंदी : होळीसाठी पोलिसांनी कसली कंबर
नागपूर. रंगाचा उत्सव असलेल्या होळीच्या (Holi) उत्साहावर वरजण पडू नये, यासाठी शहर पोलिसांनी (city police ) कंबर कसली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar ) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व ठाणेदारांसह आढावा बैठक घेतली. यावेळी काही ठाणेदारांच्या कामावर आक्षेप घेत त्यांनी चांगलेच फटकारले. या बैठकीचा मुख्य उद्देश होळीच्या तयारीचा आढावा घेणे होते. 6 मार्चच्या सायंकाळपासून 8 मार्चच्या रात्रीपर्यंत जवळपास 48 तास पोलिस कर्मचारी, अधिकारी बंदोबस्तात तैनात असतील. शहरातील सर्व संवेदनशील परिसरांबाबतही या बैठकीत चर्चा झाली. शहरात 60 ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट असतील. तसेच वाहनांवर धुकाकूळ आणि दारू पीऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 40 ठिकाणांवर नाकाबंदी (Blockade at 40 places) केली जाईल. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येईल. सर्व मुलींच्या वसतिगृहांसमोर पोलिसांचा पाहारा असेल.
सर्व ठाणेदारांना दोन दिवस आधीपासूनच तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच गुन्हेगारांवर फास आवळण्याची तयारीही सुरू झाली आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई ही केली जात आहे.
होळीला अवैधरित्या दारू विकणारे सक्रिय होतात. त्यामुळे सर्व ठाणेदारांना त्यांच्या ठाण्यांतर्गत गस्त वाढविण्यास सांगण्यात आले आहे. भिवसनखोरी आणि रामटेकेनगरसह सर्व संबंधित परिसरात देशी मोहाची दारू बनवणाऱ्यांवरही कारवाई सुरू झाली आहे. तसेच देशी दारू दुकानदारांनाही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांच्या दुकानासमोर कोणतेही खाद्यपदार्थांचे ठेले लागणार नाही. जर या निर्देशांचे उल्लंघन झाले तर एक महिन्यासाठी दुकान बंद करण्यात येईल. तसेच सावजी भोजनालयात दारू उपलब्ध करून देणाऱ्यांविरुद्धही विशेष मोहीम राबविली जात आहे. 4 मार्चपासून पोलिस वेगवेगळ्या परिसरांमध्ये ‘रूट मार्च’ सुरू करतील.

शांतता समितीची बैठक
होळीसोबतच शबे बारात हा सण ही येत आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक बांधिलकी कायम ठेवणे पोलिसांची विशेष जबाबदारी असेल. सर्व ठाणेदारांना त्यांच्या परिसरात शांतता समितीची बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकारीही सेंट्रल पीस कमिटीची बैठक घेणार आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. बंदोबस्तात जवळपास 4 हजार पोलिस तैनात असतील. त्यांच्या मदतीसाठी होमगार्डही असतील. लवकरच एसआरपीएफची तुकडीही नागपूरला पोहोचणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा