डिगडोह, निलडोह होणार नगर परिषद! जिप स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी

0

नागपूर. शहरालगत असलेल्या डिगडोह, निलडोह (digdoh, nildoh) ग्रामपंचायतींचे एकत्रिकरण करून नगर परिषदेचा दर्जा दिला जावा, ही स्थानिक रहिवाशांची जुनीच मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेता दिनेश बंग, स्थानिक जिप सदस्य संजय जगताप, विरोधी पक्ष नेते आतिश उमरे आदींकडून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव पुढील प्रक्रियेसाठी रितसर राज्य सरकारकडे पाठविला जाईल. यापूर्वी 2015 मध्ये डिगडोह व निलडोह ग्रामपंचायतचे क्षेत्र महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी जोरकसपणे पुढे रेटण्यात आली होती. त्यावेळीही जिल्हा परिषदेकडून त्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही. आता नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी (Approval of the proposal to grant the status of Municipal Council ) प्रदान करण्यात आली असून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश जिप अध्यक्ष कोकड्डे यांनी दिले आहेत. स्थायी समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यात नवीन नगर परिषद तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मानले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात प्राथमिक उपचार कक्ष कार्यान्वित करण्याचा निर्णयसुद्धा आजच्या बैठकीत घेण्यात आला. अलिकडेच कृषी विभागातील एक कर्मचारी उच्च रक्तदाबामुळे भोवळ येऊन बेशुद्ध पडला होता. अशा घटना घडल्यास तत्काळ उपचार मिळावेत, या दृष्टीने या केंद्राची स्थापना केली जाणार आहे.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा

स्थायी समितीचे सदस्य आणि राकाँचे गटनेते दिशेश बंद म्हणाले की, डिगडोह व निलडोह औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या दाटीवाटीच्या वसाहती आहेत. विकासकामे करताना ग्रामपंचायतवर अनेक मर्यादा येतात. यामुळे या परिसराला नगर परिषदेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. राकाँचा नेहमीच या मागणीला पाठिंबा राहिला आहे. सरकारने जनतेच्या भावनेचा आदर करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा