महापारेषणच्या बेसा अतिउच्चदाब उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम पूर्ण

0

नागपूर दि. 26  मे २०२३: महापारेषण कंपनीच्या बेसा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम आज गुरुवारी सायंकाळी ७ वाजता पूर्ण झाले असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर तो कार्यान्वित करण्यात आला आहे. ट्रान्सफॉर्मर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यामुळे वीज ग्राहकांना नेहमीप्रमाणे वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. तसेच बुधवारी रात्री महावितरणने प्रभावी भार व्यवस्थापन केल्यामुळे केवळ ६ फीडर वरील वीज ग्राहकांना अर्धा ते एक तासाच्या वीज कपातीचा सामना करावा लागला.

२१ मे रोजी महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील २५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मेर नादुरुस्त झाल्याने महावितरणच्या नागपूर शहरातील महाल विभाग अंतर्गत असणाऱ्या वीज ग्राहकांना वीज कपातीचा सामना करावा लागला.यादरम्यान ग्राहकांना अडचण होऊ नये म्हणून महावितरणच्या वतीने आवश्यकतेनुसार ग्राहकांना जास्तीत-जास्त दिलासा देत भार व्यवस्थापन करण्यात आले. बुधवारी रात्री ९ पैकी केवळ ६ फीडरवर अर्धा ते एक तास भार व्यवस्थापन करण्यात आले.

महापारेषणच्या वतीने ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम दिवस-रात्र करण्यात आले.तसेच या दरम्यान महावितरणचे अधिकारी ग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दिवस-रात्र नियोजन करीत होते. ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करताना महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे, अधीक्षक अभियंता राजन जोशी,आत्राम,कोकाटे,प्रशांत खटी,पवणीकर, मोटघरे तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे,कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, मुकेश चौधरी,संजीव सुर्यवंशी,धर्मेंद्र खडगी,रुपेश चव्हाणश्रीराम मुत्तेपवार प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार असून त्यानंतर या ट्रान्सफॉर्मरवरून वीज पुरवठा करण्यात येणाऱ्या वीज वाहिन्यांवर भार व्यवस्थापन करण्यात येणार नाही. तसेच ग्राहकांना नेहमीसारखा वीज पुरवठा उपलब्ध होईल.