मविआच्या छत्रपती संभाजीनगरातील सभेला सशर्त परवानगी

0

छत्रपती संभाजीनगरः रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरात दंगल उसळल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सभा होऊ नये, यासाठी दंगल घडविण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. आता महाविकास आघाडीच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी 15 अटी घालण्यात आल्या असून येत्या 2 एप्रिल रोजी ही सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे सभेला मार्गदर्शन करणार आहेत. दुसरी सभा 16 एप्रिल रोजी नागपुरात तर मुंबईत 1 मे रोजी, पुण्यात १४ मे रोजी, २८ मे ला कोल्हापूर आणि 3 जून रोजी नाशिक आणि नंतर अमरावती येथे संयुक्त सभा घेतली जाणार असल्याचे आघाडीच्या सूत्रांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी मराठा सांस्कृतिक मंडळावर ही सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. त्यात काही अटी घातल्या आहेत. ही सभा संध्याकाळी 5 ते रात्री 9.45 या वेळेतच घ्यावी लागेल. सभेचे ठिकाण आणि वेळेत बदल करू नये, सभेसाठी येणाऱ्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करू नये. सभेला येताना शस्त्र बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सभा ठिकाणी कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. या ठिकाणी गोंधळ, ढकलाढकली, चेंगराचेंगरी झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल. सभेमुळे वाहतूक कोंडी होऊ नये. रस्ता बंद राहू नये. सभेच्या वाहनांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, असे पोलिसांनी बजावले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा