धक्काबुक्कीत पायऱ्यांवरून पडून महिलेचा मृत्यू

0

 

शोभायात्रेदरम्यान बर्डीत घटना

नागपूर. राम नवमीच्या पर्वावर (Ram Navami festival) गुरुवारी शहरातून ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली. तीन वर्षांच्या खंडातनंतर निर्बंधमुक्त वातावरणात शोभायात्रा निघाल्याने भाविकांची अलोट गर्दी (crowd of people ) झाली होती. त्यातच क्षुल्लक कारणावरून दोन गटात भांडण झाले. प्रकरण हाताघाईवर पोहोचले. धक्काबुक्की सुरू असताना एक महिला पायऱ्यांवरून पडली (woman fell down the stairs). डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री बर्डीतील फॉर्च्युन मॉल (Fortune Mall in Buldi) येथे घडली. संतोषी रामकिशोर बिनकर (53) रा. बालाजीनगर, मानेवाडा असे मृताचे नाव आहे. त्या बहिणीचे कुटुंब व अन्य नातेवाईकांसोबत शोभायात्रा पाहण्यासाठी बर्डी परिसरात गेल्या होत्या. त्यांचे अलिकडेच पित्ताशयाचे ऑपरेशन झाले आहे. त्यांना उभे राहण्यात त्रास जाणवत होता. यामुळे नातेवाईक त्यांना जवळच्या फॉर्च्युन मॉलच्या आत पायऱ्यांवर बसण्यासाठी घेऊन गेले होते. तिथेच ही घटना घडली.

संतोषी, त्यांची बहिण व अन्य नातेवाईक मॉलच्या पायऱ्यांवर बसले होते. त्याच्यासोबतच इतरांचे देखील पायऱ्यांवरून येणे-जाणे सुरू होते. 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीला संतोषी यांच्या बहिणीचा पाय लागला. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. आरोपीने शिवीगाळ सुरू केली. वाद वाढू नये, या दृष्टीने संतोषी व त्यांचे अन्य नातेवाईक मध्यस्तीसाठी मध्ये पडले. पण, त्याचा उलट परिणाम झाला. आरोपीच्या मदतीला आणखी तीन महिला धावून आल्या. एकमेकांना धक्काबुक्की सुरू झाली. त्यातच धक्का लागून संतोषी या पायऱ्यांवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कसेबसे गर्दीतून वाट काढत त्यांना पंचशील चौकातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण, तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले. या घटनेमुळे बिनकर कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडून शोककळा पसरली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

यंदाचे शोभायात्रेचे 57 वे वर्ष होते. पोद्दारेश्वर राम मंदिरचे शताब्दी वर्ष असल्याने दरवर्षीपेक्षा शोभायात्रेची भव्यता जरा जास्तच होती. भाविकांनी देखील अलोट गर्दी केली होती.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा