विद्यापीठाला 20 कोटींचा निधी

0

जागतिक दर्जाचे क्रीडासंकुल उभारणार

नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (Rashtrasant Tukdoji Maharaj in Nagpur University ) जागतिक दर्जाचे आंतर क्रीडासंकुल उभारण्यासाठी राज्य शासनाकडून 20 कोटींचा निधी (20 crore fund from the state government) वितरित करण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्याने क्रीडा संकुलाच्या कामांना वेग येणार आहे. नागपूर विद्यापीठाचे हे शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी कुलगुरू सुभाष चौधरी यांनी राज्य शासन तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग वाढवा, सोबतच शाळा व अन्य संस्था, व्यक्तींनासुद्धा लाभ व्हावा, या दृष्टीने जागतिक दर्जाच्या आंतर क्रीडासंकुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. या क्रीडा संकुलासाठी 44.41 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या अंदाजपत्रकाला 13 मार्चला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यानंतर तातडीने निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बुधवारी, 29 मार्चला निधी वितरणासंदर्भातील शासनादेश निर्गमित केला आहे. त्यामुळे आता आंतर क्रीडा संकुल लवकरच साकारण्या्या कामांना सुरुवात होऊ शकणार आहे. आंतर क्रीडासंकुलामुळे नागपूर शहरच नव्हे तर मध्य भारतातील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान सरावासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यापीठासह येथील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुलाचा लाभ घेता येणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना 4 ऑगस्ट 1923 रोजी झाली. विद्यापीठाचा परिसर 373 एकर मध्ये विस्तारला आहे. मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या नागपूर विद्यापीठाने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. 2022-23 वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने विद्यापीठाच्या अंगीकृत ज्ञान निर्मिती आणि कौशल्य निर्मिती बरोबरच परिक्षेत्रातील जनसमुहाच्या भौतिक गरजा लक्षात घेतल्या आहे. त्याबरोबर भविष्यातील विकासाच्या शक्यतांचा वेध घेऊन काही नवीन प्रकल्पाची उभारणी करण्यास विद्यापीठाने सुरुवात केली. याकरिता हा निधी उपलब्ध झाला आहे