काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी

0

 

मुंबई: काँग्रेसचे निलंबीत नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आशिष देशमुख यांनी काही महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. अलीकडेच आशिष देशमुख आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आशिष देशमुख यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोलले जात आहे. या कारवाईनंतर आशिष देशमुख नेमकी काय भूमिका घेतात ते कुठल्या पक्षाची वाट धरतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
मूळ काँग्रेसच्या विचारांचे असलेले आशिष देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती. त्यांनी देशमुख यांचा पराभव केला होता. आमदार राहिलेल्या देशमुख यांना भाजपमध्ये फार काळ राहता आले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर टीका करीत तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भाजपशी जावळीक साधून असल्याची चर्चा आहे.