दिल्ली (Delhi) : देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. देशभरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे सरकारसह सर्वसामान्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य मंत्रालयानं (Indian Ministry of Health) शुक्रवारी (14 एप्रिल) दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 109 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 49 हजारांच्या पुढे गेली आहे.गेल्या काही दिवसांत दिल्ली-राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन, छत्तीसगड-पंजाबमध्ये प्रत्येकी दोन, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एकाला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय केरळमध्ये नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तथापी, दैनंदिन संसर्ग दर 5.01 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर साप्ताहिक संसर्ग दर 4.29 टक्के आहे. देशात आतापर्यंत 4,47,97,269 लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या एकूण रुग्णांपैकी 0.11 टक्के आहे. संसर्गातून बरे होण्याचा दर 98.70 टक्के आहे. आतापर्यंत 4,42,16,586 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. मृत्यू दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. लसीकरणाबद्दल बोलायचे तर देशात कोविडविरोधी लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, गुरुवारी, भारतात कोरोनाचे 10 हजार 158 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानुसार, भारतात कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 4.42 टक्के आणि साप्ताहिक दर 4.02 टक्के होता. सध्या देशात सक्रिय प्रकरणांची संख्या एकूण प्रकरणांपैकी 0.10 टक्के आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या सात दिवसांत देशात 42 हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, संसर्गामुळे 97 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) रिजनल मेडिकल रिसर्च सेंटर, गोरखपूरचे संचालक डॉ. रजनीकांत यांना कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘भारतात चौथी लाट येणार नाही. आता देशातील बहुतांश लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. म्हणूनच घाबरण्याची गरज नाही तर सुरक्षित राहण्याची गरज आहे. प्रतिबंधासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे.’