Home Top News कृषी महाविद्यालयाच्या नावावरून आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई

कृषी महाविद्यालयाच्या नावावरून आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई

0

 

बुलढाणा – राज्य सरकारकडून बुलढाण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या नावावरून बुलढाण्यात शिवसेना आणि भाजपाच्या आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यात ही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत बुलढाणा येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची आणि या शासकीय कृषी महाविद्यालयाला राज्याच्या माजी कृषिमंत्री दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आभार मानले आहेत. बुलढाणा येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाला देण्यात आलेल्या माजी कृषीमंत्री दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचे देण्यात आलेले नावाला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोध दर्शवून या कृषी महाविद्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय बदलायला लावणार असल्याचे सांगितले आहे. माझा माजी कृषीमंत्री दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाला विरोध नाही त्यांचा मला आदर आहे, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हणत माझ्या मतदारसंघात मी निर्णय घेणार आहे, असेही यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत. दरम्यान, हे शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाण्यात मीच आणले आहे, असा दावा शिवसेना आणि भाजपचे दोन्ही आजी-माजी आमदार करीत आहेत.