अर्जुन पुरस्कार पटकावणारे पहिले क्रिकेटपटू
दिल्ली (delhi) – देशात सर्वत्र आयपीएलचा (IPL) ज्वर उफाळून आला असतानाच क्रिकेट विश्वासह अवघ्या क्रीडा क्षेत्रासाठी दुःखद अशी घटना घडली आहे. टीम इंडियाचे (Team India) माजी क्रिकेटपटून सलीम दुर्राणी यांचे निधन (Salim Durrani passed away ) झाले. रविवारी सकाळी गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते. दुर्रानी यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता. तो ही झुंज आज संपली. दुर्रानी हे अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले. सलीम दुर्राणी यांचा जन्म अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये झाला होता. ते अनेक वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळले. या दिग्गज खेळाडूला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धाजली देण्याचा क्रम सुरू आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. (Cricketer Salim Durrani passed away)
सलीम दुर्राणी यांनी १ जानेवारी १९६० रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून कसोटीत पदार्पण केले होते. जवळपास १३ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळले आहे. यादरम्यान, त्यांनी २९ कसोटी सामन्यांमध्ये २५.०४ च्या सरासरीने फलंदाजी करत १२०२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या बॅटने १ शतक आणि ७ अर्धशतके झळकावली. चाहत्याच्या मागणीनुसार षटकार ठोकणारा फलंदाज अशी त्यांची ख्याती होती. फलंदाज असा लौकिक असला तरी गोलंदाजीतही ते उजवेच ठरले. डावखुऱ्या हाताचे फिरकी गोलंदाज असणाऱ्या दुर्रानी यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७५ विकेट्सही घेतल्या आहेत. सलीम दुर्राणी यांनी केवळ कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी शेवटची कसोटी ६ फेब्रुवारी १९७३ रोजी इंग्लंडविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळली.
दुर्राणी यांचा लुकची चाहत्यांवर मोहिनी होती. याच बळावर त्यांना बॉलिवूड चित्रपटात कामाची संधी देखील मिळाली. १९७३ मध्ये सलीम यांनी चरित्र नावाच्या चित्रपटात काम केले. त्या चित्रपटात दुर्रानी यांनी तत्कालीन स्टार अभिनेत्री परवीन बाबीसोबत काम केले होते. याशिवाय सलीम यांना २०११ मध्ये बीसीसीआयकडून सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. या दिग्गज खेळाडूला चाहत्यांसोबतच क्रीडा विश्वाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.