
मुंबई : राज्याच्या काही भागात अवकाळी पावसामुळे (Crop Damage due to Unseasonal Rain) राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis in Vidhan Sabha) यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत दिली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचे नुकसान झाले असून सरकारने नुकसानग्रस्त भागाची माहिती मागविली आहे असे सांगताना विरोधकांनी या मुद्यावर राजकारण करु नये, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांना नुकसानीच्या मागणीवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत गोंधळ घातला. सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी नुकसानीची माहिती देताना फडणवीस यांनी सांगितले की, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांत नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात या भागात 760 हेक्टरचे आंबा आणि काजूचे नुकसान, नाशिक जिल्ह्यात 2 हजार 685 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, झाल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात अनुक्रमे 775 हेक्टर आणि 475 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात काल रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रकारच्या मदतीचे आदेश दिले आहेत. तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवले आहेत.