छत्रपती संभाजीनगर नामांतरावरुन राष्ट्रवादीतही वाद, पदाधिकारी राजीनामे देणार

0

छत्रपती संभाजीनगरः छत्रपती संभाजीनगर असे औरंगाबादचे नामांतर केल्यामुळे एमआयएम हा पक्ष नाराज असून या पक्षाकडून आंदोलन सुरु असतानाच (Renaming of Aurangabad City) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत सामुहिक राजीनामे देण्याची भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष होता. मात्र, नामांतरास समर्थन दिल्यामुळे आमची ही भावना संपली असून आमच्यासोबत पक्ष न्याय करू शकत नाही, असे वाटत असल्याने सामुहिक राजीनामे देणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या शासन काळात छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराच्या ठरावास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी सहमती दिली आणि त्यानंतर शहराचे नामांतर करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले, असा आमचा विश्वास आहे. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीने नामांतराला परवानगी दिल्याने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 10 पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील 40 पदाधिकारी अशा एकूण 50 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे नामंतराचा हा मुद्दा आता राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
अलिकडेच राज्य सरकारचा हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केल्याने औरंगाबाद शहाराचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर असे झाले आहे. मात्र, एमआयएम या राजकीय पक्षाने या नामांतराला विरोध दर्शवित आंदोलन पुकारले आहे.