कोरची- कुरखेडा मार्गावर भीषण अपघात : जखमींना सोडून चालक पसार
कोरची. कोरची (Korchi) येथून प्रवासी घेऊन कुरखेड्याकडे (Kurkheda) निघालेल्या भरधाव क्रुझरने दुचाकीला समोरासमोर धडक दिली (Cruiser bike accident ) यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आठ जम गंभीर जखमी झाले आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह क्रुझरमधील महिला मृत्युमुखी पडली. घटनेनंतर प्रवाशांना जखमी अवस्थेतच सोडून क्रुझरचालक घटनास्थळाहून पसार झाला. गुरुवारी दुपारनंतर ही घटना घडली. अपघात ग्रस्त दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे. यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते. घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली. शिवाय आठवडी बाजारात येणाऱ्या जाणाऱ्यांचीही मोठी गर्दी रस्त्यावर होती. त्याचवेळी हा अपघात झाला. घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे वाहतुकीला बाधा निर्माण झाला होता.
गुरुवारी कोरची येथील आठवडी बाजार होता. कोरची ते कुरखेडा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या मोजक्याच असल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत होते. कोरचीवरून १० प्रवाशांना घेऊन एमएच ०४, बीक्यू १९२४ ही क्रूझर गाडी कुरखेड्याकडे भरधाव जात होती. सर्वच प्रवासी आठवडीबाजारात खरेदीसाठी जात होते. मोहगाव येथील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोहगाव येथील सबीलाल भारत सोरी (५७ वर्ष) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
जखमींमध्ये नामदेव वासुदेव तुलावी (२८ वर्षे)रा. लव्हारी, उसन मारोती लाडे (५२ वर्ष)रा. कऱ्हाडी, जयसिंग नावलसिंग फुलकवर (२४ वर्ष) रा. पांडूटोला, सोनल नरसिंग फुलकवर (३ वर्ष) रा. पांडूटोला, रेशमी रवींद्र मडावी (३५ वर्ष) रा.बेडगाव, राशी रवींद्र मडावी (९ वर्ष) रा.बेडगाव, सुरेखा हिरा निकोडे (३२ वर्ष) रा. बेडगाव यांच्यावर कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय थुल यांच्या मार्गदर्शनात डॉ. राहुल राऊत उपचार करीत आहेत.
कोरची पोलिस स्टेशनचे निरीक्षक अमोल फडतरे, सहायक निरीक्षक गणेश फुलकर यांनी घटनास्थळी जाऊन सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घटनेचा पंचनामा केला. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने वळणावर हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
चेंडूसारखा उडाला दुचाकीस्वार
या अपघातात क्रूझर गाडीचालक विजय देशमुख याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वळणावर दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, मोटारसायकलस्वार चेंडूसारखा उडून महामार्गावरून २० ते २५ फूट दूर फेकल्या गेला. त्याने डोक्यात हेल्मेटही घातलेले नव्हते. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर क्रूझर वाहन दोन कोलांट्या खाऊन महामार्गापासून १५ फुटावर जाऊन कोसळले.
तीन चिमुकल्यांसह पाच महिला जखमी
या अपघातात क्रूझरमधील १० प्रवासी जखमी झाले. त्यात तीन चिमुकल्या बालकांचा आणि सहा महिला व एका पुरुषाचा समावेश होता. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख पटलेली नव्हती. युग नामदेव तुलावी (६ महिने) हा आपल्या आईसोबत पड्यालजोब येथून लग्न समारंभातून कोरचीवरून लव्हारीला जात होता. त्याच्या डोक्याला जबर मार लागला तर सहा महिन्यांची गरोदर माता अंजना रोशन मडावी (२६ वर्ष) रा. पड्यालजोब, पूजा नामदेव तुलावी (२५ वर्ष) रा. लव्हारी या तिघांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.