सांस्कृतिक मार्क्सवाद :आपल्या देशासाठी, संस्कृतीसाठी आणि सभ्यतेसाठी एक मोठा धोका

0

 

  1. सांस्कृतिक मार्क्सवाद म्हणजे काय?

सांस्कृतिक मार्क्सवाद ही एक राजकीय विचारधारा आहे जी असे मानते की “आधुनिक जगातील सर्व शोषणाचे मूळ पारंपारिक संस्कृती आणि विश्वास प्रणालीमध्ये आहे.” क्लासिकल मार्क्सवादामध्ये वर्गविहीन समाज निर्माण करण्यासाठी आर्थिक समानतेवर भर दिल्या गेला होता. मात्र सांस्कृतिक मार्क्सवादामध्ये बहुसांस्कृतिक, बहु-लिंगी आणि अति-व्यक्तिवादी समाज निर्माण करण्यासाठी संस्कृती, लिंग, परंपरा आणि सामाजिक नीती-मूल्ये व नियम ह्या बाबतीत संपूर्ण स्वतंत्र असण्यावर भर दिला जातो.

 

  1. सांस्कृतिक मार्क्सवाद का आणि कधी सुरू झाला?

२० व्या शतकात, क्लासिकल मार्क्सवाद्यांनी आर्थिक विभाजनावर आधारित पाश्चात्त्य समाज तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते साध्य करता आले नाही. म्हणून, पाश्चात्त्य जगाचा पाया तोडण्यासाठी, त्यांना सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची (renaissance) गरज होती, जी समाजाच्या मजबूत सांस्कृतिक संस्थांना पोखरून टाकेल आणि मार्क्सवादी क्रांती घडवून आणेल. सांस्कृतिक मार्क्सवादाची प्रारंभिक सूत्रे फ्रँकफर्ट इन्स्टिट्यूटमध्ये सुरू झाली, जी १९२३ मध्ये जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे स्थापित झाली होती. येथे मॅक्स हॉर्कहाइमर, थिओडोर ॲडॉर्नो आणि हर्बर्ट मार्क्यूज यांसारख्या विचारवंतांनी ‘क्रिटिकल थिअरी’ (Critical Theory) विकसित केली, ज्यामध्ये संस्कृतीचा उपयोग समाज तोडण्यासाठी किंवा घडवण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याचे विश्लेषण केले गेले.

 

  1. सांस्कृतिक मार्क्सवादाचे मूलभूत उद्दिष्ट काय आहे?

सांस्कृतिक मार्क्सवादाचे मूलभूत उद्दिष्ट समाजाला शोषक आणि शोषित (बहुसंख्य/अल्पसंख्य, गुन्हेगार/बळी) अशा दोन वर्गात विभाजित करणे आहे, जेणेकरून पारंपारिक समाज आणि विश्वास प्रणाली पूर्णपणे कोलमडून पडेल आणि शेवटी मार्क्सवादी क्रांती होईल.

  1. सांस्कृतिक मार्क्सवाद कुठल्या मूलभूत तत्वांवर आधारित आहे?

सांस्कृतिक मार्क्सवादाचे मूलभूत तत्त्व असे आहे की, समाजात पूर्वापार रुजलेले सांस्कृतिक घटक – कुटुंब, धर्म आणि धार्मिक विधी, आध्यात्मिकता, नैतिकता, नैसर्गिक लिंग आणि वांशिक बहुसंख्यांक हे घटक समाजाचे शोषक (गुन्हेगार) आहेत आणि जे लोक हे स्वीकारत नाहीत किंवा त्यांचे पालन करत नाहीत ते शोषित (बळी) आहेत. सांस्कृतिक मार्क्सवाद्यांचा असा विश्वास आहे की हे सांस्कृतिक घटक समाजात सामाजिक, लैंगिक आणि वांशिक असमानता टिकवून ठेवण्यासाठी सत्ता संरचनांना बळकटी देतात.  स्वतंत्रपणे समाजातील समस्या सोडवण्याऐवजी, सांस्कृतिक मार्क्सवादी या समस्यांच्या अस्तित्वाचा दोष केवळ संस्कृतीला देतात. त्यामुळे संस्कृती तोडून-मोडून काढण्यासाठी हे मार्क्सवादी पारंपारिक समाजांच्या मूलभूत घटक असलेल्या कुटुंब संरचनेला उद्ध्वस्त करण्यावर लक्ष केंद्रित करतात. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे चित्रपट, दूरदर्शन, साहित्य, प्रसार माध्यमं आणि शिक्षण यांसारख्या जनसंस्कृतीच्या पैलूंचा उपयोग करतात.

  1. सांस्कृतिक मार्क्सवादाचे पैलू काय आहेत?

सांस्कृतिक मार्क्सवादाचे चार प्रमुख पैलू आहेत:

  • अतिव्यक्तिवाद (Extreme Individualism): हा पैलू कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्यांचा कोणताही विचार न करता वैयक्तिक हक्कांवर अत्यंत भर देतो. यामुळे तरुण लोक स्वैर आणि अतिशय व्यक्तिवादी बनतात. ते कुटुंबापासून वेगळे राहणे पसंत करतात आणि कुटुंबातील सदस्यांशी सहकार्य करण्याऐवजी एकटे, एकाकी जीवन जगतात.
  • विकृत स्त्रीवाद (Perverted Feminism):खरा स्त्रीवाद महिलांना समान हक्क आणि संधी मिळवून देण्यास मदत करू शकतो, परंतु सांस्कृतिक मार्क्सवादी स्त्रीवादाला “पुरुष विरुद्ध स्त्रिया” असेच प्रचारित करतात.  ते प्रत्येक मुद्यामध्ये स्पर्धा (man VS woman), अवास्तव समानता आणि चुकीचा अहंकार घुसडतात. त्यांची अशी मान्यता आहे की विवाह संस्था ही पूर्णपणे पितृसत्ताक आहे. म्हणून स्त्रिया एकट्या आणि स्वतंत्र राहिल्या तर जास्त आनंदी राहतात. अशा मान्यतांमुळे घटस्फोटाचे प्रमाण अभूतपूर्व वाढते आणि कौटुंबिक संरचना मोडकळीस येते. या मोडलेल्या कुटुंबांच्या पुढील पिढ्या त्याच विकृत स्त्रीवादच्या विचारसरणीला पुढे नेतात, ज्यामुळे समाजाची स्थिती आणखीनच बिघडते.
  • ट्रान्सजेंडरवाद (Transgender-ism): जगात ०.२ टक्के लोक जैविकदृष्ट्या ट्रान्सजेंडर आहेत. परंतु सांस्कृतिक मार्क्सवादी ट्रान्सजेंडरवादाला स्वातंत्र्याच्या पॅकेजमध्ये गुंडाळून विकतात आणि तरुण मुलांना त्यांचे नैसर्गिक लिंग सोडून ट्रान्सजेंडरवाद स्वीकारण्यास प्रोत्साहित करतात. हा विचार शाळा, साहित्य, प्रसार माध्यमं आणि इतर उपलब्ध स्रोतांद्वारे अत्यंत पद्धतशीरपणे पेरला जातो.
  • लैंगिक क्रांती (Sexual Revolution):सांस्कृतिक मार्क्सवाद विवाहापूर्वीची पावित्र्यता, एकनिष्ठता, प्रामाणिकपणा इत्यादी अनेक पारंपारिक लैंगिक मूल्यांना कमी लेखतो आणि बहुविवाह, व्यभिचार, अनैसर्गिक लैंगिकता आणि पारंपारिक अर्थाने अनैतिक असलेल्या प्रत्येक गोष्टीचे उदात्तीकरण करतो. सांस्कृतिक मार्क्सवादी LGBTQ+ चळवळींना अवास्तव चालना देखील देतात. यामुळे एक गोंधळलेली, विकृत तरुण पिढी निर्माण होते जी शिक्षणाऐवजी  किंवा कोणतेही रचनात्मक काम करण्याऐवजी केवळ लैंगिकतेवर लक्ष केंद्रित करते.

 

  1. वॊकिझम (Wokeism) आणि सांस्कृतिक मार्क्सवाद संबंधित आहेत का?

होय. वोक-वाद (Wokeism) सांस्कृतिक मार्क्सवादाचा एक भाग आहे ज्यामध्ये प्रामुख्याने लिंग, वंश आणि लैंगिक प्रवृत्तीबद्दलच्या पारंपारिक मतांना विरोध केला जातो. ह्यामध्ये जैविक तथ्यांपेक्षा मानसिकदृष्ट्या “वाटणाऱ्या” लिंग-ओळखीवर भर  दिल्या जातो. म्हणजे “मला आज वाटले म्हणून आज मी पुरुष आहे. काल मला वाटत होते म्हणून काल मी स्त्री होते. उद्या मला वाटले तर मी कुत्रा किंवा मांजर सुद्धा बनू शकतो”.  पूर्णपणे व्यक्तिवादी, स्वतंत्र आणि “politically करेक्ट”  समाज निर्माण करणे हा त्यामागचा हेतू आहे. परंतु बहुतेक वेळा असे दिसून येते की फक्त अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचा  आपला अजेन्डा पूर्ण करण्यासाठी बावचळलेल्या, गोंधळलेल्या, विकृत, खोट्या, बनावट, व्यक्तींना समर्थन  दिले जाते .

  1. सांस्कृतिक मार्क्सवाद धर्माच्या, विशेषतः हिंदू धर्माच्या विरोधात आहे का?

नक्कीच. मूलभूत तत्त्वानुसारच, सांस्कृतिक मार्क्सवाद हा निरीश्वरवादी आहे. कुठलाही धर्म, धार्मिक विधी किंवा विचार, साहित्य, म्हणजे सरळ-सरळ अंधश्रद्धा आहे हे सांस्कृतिक मार्क्सवादाचे मूळ तत्व आहे. शिवाय धर्म हे सत्ताधारी वर्गाकडून सत्ता टिकवण्यासाठी आणि सामान्य लोकांचे शोषण करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे अशी सुद्धा ठोस मान्यता आहे. विशेषतः हिंदुत्वासारखा जटिल धर्म जो समजून घेणे आणि नियंत्रित करणे खूप कठीण आहे, त्याला सांस्कृतिक मार्क्सवादी जोरदार विरोध करतात. वर्तमान परिस्थितीत विविध स्वरूपात हिंदू धर्माचे जागतिक पातळीवर पुनरुत्थान होते आहे . त्यामुळे भविष्यत मार्क्सवाद्यांना हिंदूंविरुद्ध कार्यवाही करण्याचा आणखीनच चेव येणार आहे हे निश्चित.

  1. सांस्कृतिक मार्क्सवाद हे भारतीयांसाठी काळजीचे कारण आहे का?

होय. भारतीयांनी (विशेषतः पालकांनी) आपल्या पुढील पिढीला सांस्कृतिक मार्क्सवादाच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी येणाऱ्या काळात अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. फ्रँकफर्ट स्कूलमधील प्रा. विली मुन्झेनबर्ग म्हणाले होते की “आम्ही पश्चात संस्कृतीला इतके बदलून टाकू की त्यातून दुर्गंधी येईल. We will make the western civilization stink” आता मार्क्सवाद्यांच्या १०० वर्षांच्या प्रयत्नानंतर, आपण पाहू शकतो की पाश्चात्त्य सभ्यता संपूर्णपणे विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे.

आज भारत सगळ्यांच आघाड्यांवर वेगाने प्रगती करत आहे, यामुळेच सांस्कृतिक मार्क्सवादी भारताला लक्ष्य करतील आणि आपल्या स्वदेशी सभ्यतेला नष्ट करून पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने आपापल्या परीने सावध असणे खूप महत्वाचे आहे.

  1. भारतात सांस्कृतिक मार्क्सवादी कसा ओळखावा?

सांस्कृतिक मार्क्सवादी आपला अजेंडा चालवण्यासाठी आणि लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी शिक्षण, साहित्य, प्रसार  माध्यमे आणि सार्वजनिक व्यासपीठांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे या क्षेत्रातील अशा प्रभावशाली व्यक्तींकडे लक्ष दिले पाहिजे जे कुटुंब, संस्कृती, विवाह, धार्मिक सभा-समारंभ इत्यादी पारंपारिक मूल्यांना सतत विरोध करतात.

सांस्कृतिक मार्क्सवादी हे आपला अजेन्डा चालवण्यासाठी काय काय करतात ह्याची काही उदाहरणे खाली दिली आहेत:

  • हिंदू सणांना विशेषतः दिवाळी (फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण) आणि होळी (पाण्याचा अपव्यय) दणकून विरोध करणे आणि ह्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे .
  • गाय/सर्प पूजा, उपवास, विशिष्ट खाद्यपदार्थांची आवड इत्यादी स्वदेशी चालीरीती आणि विधींबद्दल द्वेष आणि लाज निर्माण करणे.
  • आपल्या धर्माचे पालन करण्याबद्दल लाज वाटायला लावणे. उदा. ख्रिश्चन धर्मप्रचारक सतत हिंदू धर्माला “मागासलेला, वर्ग आणि जातीवर आधारित कालबाह्य धर्म ज्याला आधुनिक जगात स्थान नाही” म्हणून प्रचार करतात,
  • धार्मिक, शूर आणि न्यायप्रिय हिंदू शासकांवर चुकीची आणि अति टीका करणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे, तर क्रूर, नीच आणि धूर्त गैर-हिंदू शासकांची अतिशयोक्तीने प्रशंसा करणे. उदा. – महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी यांना अक्षम, भित्रे ठरवले जाते, तर औरंगजेबाची खूप स्तुती केली जाते.
  • हिंदू इतिहास पूर्णपणे लपवणे आणि शिक्षणात गैर-हिंदू इतिहासाचे उदात्तीकरण करणे. उदा. – केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळात मोगल सम्राट आणि त्यांच्या राजवंशांवर अनेक प्रकरणे आहेत, तर अनेक प्रमुख हिंदू राजवंशांबद्दल कोणतीही माहिती  नाही.
  • कुंकू, दागिने, जानवे, टिळा इत्यादी हिंदू धर्माची चिन्हे परिधान करणाऱ्या लोकांची खिल्ली उडवणे.
  • चित्रपटांमध्ये हिंदू ठाकूर, बनिया, लाला यांना सामान्य लोकांचे शोषण करणारे क्रूर खलनायक म्हणून जाणीवपूर्वक दाखवणे, तर रहीम चाचा आणि फादर जॉन सारखी दयाळू आणि मदत करणारी गैर-हिंदू पात्रे निर्माण करणे.
  • उच्च जातीच्या हिंदूंच्या उपलब्धींना हेतुपुरस्सर नाकारणे आणि सध्याच्या समाजात गोंधळ आणि संघर्ष निर्माण करण्यासाठी ऐतिहासिक तथ्यांचे विकृतीकरण करणे.
  • तरुण मुलींमध्ये चुकीचे आदर्श निर्माण करण्यासाठी एकल, स्वैर, आक्रमक, अनेक लैंगिक-जोडीदार असलेल्या स्त्रियांचे उदात्तीकरण करणे.
  • भारतविरोधी कथनाचे (narrative) अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून प्रचार करणे. उदा. “भारत तेरे तुकडे होंगे” गँग, “अफजल गुरु बचाओ गँग” इत्यादी.
  • वादग्रस्त आणि खळबळजनक संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थिर, पारंपरिक मूल्य प्रणालीवर सतत टीका करणाऱ्या सामान्य लेखकांना किंवा तत्सम विचारवंतांना बौद्धिक आदर्श बनवणे.
  • संत, योगी आणि अध्यात्मिक गुरुजनांची सार्वजनिकरित्या खिल्ली उडवणे, त्यांना भ्रष्ट आणि पैसे खाणारे ढोंगीबाबा म्हणून संबोधणे.
  1. आपण आपल्या मुलांना सांस्कृतिक मार्क्सवादाच्या प्रभावापासून कसे वाचवू शकतो?

आपल्या मुलांना सांस्कृतिक मार्क्सवादी विचारसरणीच्या वाढत्या प्रभावापासून वाचवण्यासाठी भारतीयांनी आणि विशेषतः हिंदूंनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपली मुले आपली सांस्कृतिक ओळख जपतील आणि आपल्या धर्माबद्दल अभिमान बाळगतील याची खात्री करण्यासाठी:

  • हिंदू संस्कृतीत हजारो वर्षांचे ज्ञान, विज्ञान, तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान  हे  कला, साहित्य, संगीत आणि कथाकथनाद्वारे सामाजिक जाणिवेशी अखंडपणे जोडले गेले आहे. अशा ह्या आपल्या विस्तृत आणि समृद्ध वारशाबद्दल आपल्या मुलांना जागरूक करा.  हा इतिहास आहे, सत्य आहे – मिथक (mythology) नाही हे मुलांना पदोपदी सांगा.
  • घरी धार्मिक सण-समारंभ करा आणि योग्य विधिनियमांचे पालन करा, परंतु ते करताना मुलांनाही सामील करून घ्या आणि प्रत्येक विधीमागील वैज्ञानिक कारण समजावून सांगा.
  • राजकुमार आणि राजकुमारींच्या उथळ परीकथांऐवजी रामायण, महाभारत, गीता, पुराणे किंवा पंचतंत्राच्या कथा सांगा.
  • त्यांना किमान एक पारंपारिक भारतीय कला प्रकार शिकवा, जसे की नृत्य, नाट्य, वाद्ये, गायन किंवा अगदी मधुबनी, गोंड, वारली, कलमकारी इत्यादी प्रकारच्या चित्रकला शिकवा .
  • सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम जसे गणेशोत्सव, होलिकादहन, गोकुळाष्टमी ह्यामध्ये उत्साहाने भाग घ्या. मुलांना त्याचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. शिवाय नातेवाईक, मित्रपरिवार ह्यांची नियमित भेट घ्या. मंदिरांना भेट द्या.
  • मुलांच्या दैनंदिन समस्या सांस्कृतिक कथांमधून समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. उदा. तुम्हाला लक्ष केंद्रित करायला शिकवायचे असेल, तर अर्जुनाच्या आणि पक्ष्याच्या डोळ्याची कथा सांगा. तुम्हाला समर्पण शिकवायचे असेल, तर हनुमानाबद्दल सांगा. तुम्हाला युद्धाची रणनीती समजावून सांगायची असेल तर – कृष्णाची, सूर्यग्रहणाची आणि जयद्रथाची कथा सांगा.
  • कामावर सांस्कृतिक चिन्हे परिधान करण्यात अभिमान बाळगा – जसे की धोतर, साड्या, मंगळसूत्र, टिकली, मनगटातील धागे, जानवे इत्यादी.

 

मुळात काय तर सांस्कृतिक मार्क्सवाद ही आपल्या देशाला, संस्कृतीला, धर्माला लागलेली वाळवी आहे. आपण बेसावध राहिलो तर ही वाळवी आपला समाज पोखरून काढू शकते.  आपला देव, देश, धर्म, समाज, संस्कृती आणि सभ्यता  आणि आपल्या पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होऊ नये असे ज्यांना वाटते त्यांनी सांस्कृतिक मार्क्सवाद्यांच्या कारस्थानाचा प्रखर विरोध केला पाहिजे

जान्हवी उखळकर

मिलिंद महाजन