बाप रे! अख्खे कुटुंबच १७ दिवसांपासून बेपत्ता !! पोलिस दखल घेत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप

0

साकोली. : जमिनीशी संबंधित वादातून महिलेने सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा (Warning of self-immolation ) जिल्हा प्रशासनाला दिला होता. हे कुटुंब अचानक बेपत्ता (Entire family missing ) झाले आहे. गेल्या १७ दिवसांपासून त्यांचा कोणताही थांगपत्ता नाही. चिंतेत असणाऱ्या नातेवाईकांना याबाबत पोलिसांत तक्रारही केली. पण, कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने नातेवाईक चिंतेत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सिरेगावटोला (Siregavtola in Sakoli Taluka of Bhandara District) येथील हे संपूर्ण प्रकरण आहे. गावातील अशोक पंधरे, त्याची पत्नी व दोन मुले बेपत्ता आहेत. पोलिसांकडून प्रकरणाची दखल घेतली जात नसल्याने अखेर नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेऊन या गंभीर घटनेला वाचा फोडली. पत्रपरिषदेला आदिवासी समाजाचे नेते बिसन सय्याम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी, बिरसा फायटर्सचे उपाध्यक्ष प्रमोद वरठे, नॅशनल पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष धर्मराज भलावी, सुरेश पंधरे उपस्थित होते.

अशोक पंधरे यांचे काका जयपाल पंधरे यांनी सांगितले की, सिलेगावटोला येथील शालू अशोक पंधरे यांची सावरबंध येथे वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीच्या काही भागावर सावरबंध येथील विलास बडवाईक यांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. याबाबत साकोली पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या जागेत पंधरे यांनी धान रोवणी केली होती. परंतु, बडवाईक यांनी रात्रीच धान कापून चोरून नेल्याची पंधरे यांची तक्रार आहे. पोलिसांत तक्रार करूनही बडवाईक यांनी जागेवरील ताबा सोडला नाही. त्यामुळे शालू पंधरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १३ मार्चला कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचे निवेदन दिले होते. परंतु, त्यापूर्वीच पंधरे कुटुंब बेपत्ता झाले. बेपत्ता कुटुंबाविषयी ११ मार्चला सानगडी येथील एका इंटरनेट कॅफेमधून पोलिसांत ऑनलाइन तक्रार करण्यात आली. एवढी गंभीर घटना घडल्याचे कळवूनही पोलिसांनी १५ मार्चपर्यंत गंभीर्याने घेतले नाही, असा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला.
आंदोलनाचा इशारा
भूमिअभिलेख व महसूल विभागाने सहकार्य न केल्याने पंधरे कुटुंब मानसिक तणावात होते, असा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास करून दोषींना अटक करावी व पंधरे कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा आदिवासी समाजाकडून आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.