हंसराज अहीर यांच्या पाठपुराव्याला यश
चंद्रपूर. इतिहासात कधीनव्हे ते कोरोनाच्या संकटाने रेल्वेला ब्रेक लावला. प्रवासी मजुरांची हेळसांड लक्षात घेऊन विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या. त्यानंतरही कोरोनाचे संकट कायम असल्याने अनेक गाड्यांचे थांबे कमी करण्यात आले होते. कोरोनाचे संकट पुरते ओसरल्यानंतरही तिच व्यवस्था कायम ठेवली गेली आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना गैरसोयींचा समाना करावा लागत होता. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (Hansraj Ahir, Chairman, National Commission for Backward Classes) यांनी रेल्वेगाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. आता त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यांच्या अविश्रांत परिश्रमामुळे 12721/12722 निजामुद्दीन – हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसला श्र Nizamuddin – Hyderabad Dakshin Express) भांदक स्थानकावर (Bhandak station) तर 12687-12688 मदुराई – चंदीगड एक्स्प्रेसला (Madurai – Chandigarh Express) चंद्रपूर स्थानकावर (Chandrapur station) थांबा देण्यात आला आहे. यामुळे दोन्ही मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांना जिल्ह्यात थांबे मंजूर झाल्याने प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. भांदक येथील रेल्वे थांबे पूर्ववत करण्यासाठी स्थानिक संस्था, संघटना व राजकीय क्षेत्रातील लोकांनी मोठे आंदोलन उभारले होते. उपोषणही करण्यात आले होते. उपोषण सोडवितानाच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना यापूर्वी उपलब्ध असलेल्या सर्वच रेल्वे सुविधा परत मिळवून देवू असा निर्धार हंसराज अहीर यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नही चालविले होते. दक्षिण एक्स्प्रेसचा थांबा मंजूर करवून देत अहीर यांनी आपला शब्द पूर्ण केला आहे. याशिवायही अनेक गाड्यांचे थांबेसुध्दा लवकरच सुरू करवून घेवू, असा शब्द त्यांनी भद्रावतीकरांनासुद्धा दिला आहे. त्यासाठीही आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे सुविधांकरीता अहीर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्यमंत्री यांचेशी भेट घेवून वेळोवेळी सकारात्मक चर्चाकरून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणींकडे लक्ष वेधले त्यांनी बंद झालेल्या गाड्या व आवश्यक थांबे पूर्ववत सुरू करण्यासाठी तसचे वर्तमानात सुरु असलेल्या मुंबई व पूणे या साप्ताहिक गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचीही मागणी केली आहे. याबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची गवाही रेल्वे मंत्र्यांनी हंसराज अहीर यांना दिली आहे. चंद्रपूरकरांची रेल्वेगाड्यांना थांबे मिळण्याची तसेच वाढीव फेऱ्यांची अपेक्षा लवकरच पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेतही अहीर यांनी दिले आहेत.