चालकाला डुलकी आली आणि घात झाला

0

समृद्धीवर अपघात, ५ जखमी : रुग्णवाहिका ट्रकला धडकली

वाशीम. महाराष्ट्राच्या प्रगतीचा राजमार्ग असे वर्णन केले जाते त्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Expressway ) अपघातांची मालिका सुरूच आहे. अनेक उपाययोजना करूनही अपघातांना आळा घालणे शक्य होऊ शकले नाही. वेग आणि अतातायीपणा प्रवाशांच्या जीवावर उठत आहे. सोमवारी पहाटे समृद्धी महामार्गावर कारंजा टोल प्लाझा (Karanja Toll Plaza ) परिसरात पुन्हा अपघात झाला. चिपळूणहून मध्यप्रदेशातील कटनी येथे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका मागून ट्रकवर धडकली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णवाहिकेचा चालक सतत वाहन चालवित होता. त्याला झोप अनावर झाली होती. झुलकी लागली आणि ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. रुग्णवाहिकेत मृतदेह असल्याने नातेवाईकांना गावी जाण्याची घाई झाली होती. यानंतरही ते चालकाला वाहन हळू चालविण्याबाबत सांगत होते. त्यांनी काही काळ थांबून आराम करून घेण्याचीही सूचना केली होती. मात्र, चालक ऐकूनच घेत नसल्याचेही जखमींचे म्हणणे आहे.

कटनी येथील रहिवासी असणाऱ्या एकाचा कोकणातील चिपळूण येथे मृत्यू झाला. नातेवाई अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी निघाले. एम.एच.१४ एच. जी. ०४६६ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून त्यांचा प्रवास सुरू होता. नागपूरमार्गे मध्यप्रदेशातील कटनी येथे ते जाणार होते. सतत वाहन चालवून चालक थकला होता. यानंतरही तो पुढे जाण्यावर ठाम होता. कारंजा टोल प्लाझाजवळ उभ्या ट्रकवर ही रुग्णवाहिका मागून धडकली. यात अनिकेत देवळेकर (२५), सुरज आदिवासी (२४), देवबाती आदिवासी (३०), सुखी आदिवासी (२८), संगीता आदिवासी (२७) सर्व रा. कटनी, मध्यप्रदेश हे गंभीर जखमी झाले. टोल प्लाझाजवलील घटना असल्याने तातडीने मदत कक्षाला माहिती देण्यात आली. नंदकिशोर आरेकर, डॉ. मुबारशीर शेख आणि समृद्धी १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी कटारिया, नर्स ऐश्वर्या खिल्लारे, कक्षसेवक सचिन हनुमंते, सुरक्षा रक्षक वैभव घुले, वेदांत रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक शंकर रामटेके, गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी जखमींना मदत केली.