मनोहारी ! डौलदार राजहंसांचा सावरगावच्या तलावावर विसावा

0

पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी : ग्रामस्थही आनंदले

 चंद्रपूर. निसर्गाने केलेल्या कृपादृष्टीमुळे अवघा चंद्रपूर जिल्हा जैव विविधतेने नटला (Chandrapur district is rich in biodiversity ) आहे. विस्तिर्ण जंगल, वाघांची सर्वाधिक संख्या (Highest number of tigers ) असल्याने देश विदेशातील वनप्रेमी पर्यटकांची पाऊले आपसूकच चंद्रपूर जिल्ह्याकडे वळतात. विदेशी पक्षांनासुद्धा चंद्रपुरातील जलाशये कायमच खुणावत असतात. यामुळे विदेशी पक्षांचे थवे स्थलांतरणादरम्यान येथे विसावत असतात. सध्या रुबाबदार राजहंस पक्षांचा थवा नागभीड तालुक्यातील सावरगाव (Savargaon in Nagbhid Taluka ) येथील तलावावर पाहुणपणाला आला आहे. रविवारी सकाळी तब्बल दहा राजहंस पक्ष्यांचे सावरगाव येथील तलावात दर्शन झाले. यामुळे पक्षिमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पक्षांना पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करीत आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या तलावावर अनेक स्थलांतरित पक्षी येतात. विशेषतः परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना हे जलाशय आकर्षित करीत आहेत. हीच बाब पक्षी निरीक्षकांसाठीही पर्वणीच ठरली आहे.

पांढराशुभ्र लांब मानेचा अतिशय आकर्षक राजहंस पक्षी हिमालयातून, तिबेट, कझाकिस्तान, रशिया आणि मंगोलियामार्गे उडतात. राजहंस थव्यानेच वास्तव्य करतात. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच ऑक्टोबरच्या महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात येतात. आणि मार्चच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस परत जातात. रविवारी सकाळी सावरगाव तलावात दहा राजहंस पक्ष्यांचे दर्शन झाले. तसेच चक्रांग, तलवार बदक, थापाट्या, नदीसुराई, शेकाट्या, करकोचा इत्यादी अनेक पक्षी हे पक्षिमित्र व स्वाब संस्थाचे अध्यक्ष यश कायरकर हे पक्षी निरीक्षणाला गेले असता त्यांना हे पक्षी दिसले. एका दिवसात १६०० कि.मी. उडण्याची क्षमता असलेल्या या राजहंसाच्या कळपाने सावरगावच्या तलावात तळ ठोकला आहे. दोन ते तीन किलो वजनाच्या या राजहंसच्या डोक्यावर आणि मानेवर काळ्या खुणा असतात आणि त्यांचा रंग फिकट राखडी असतो.

त्यांच्या डोक्यावर दोन काळ्या पट्ट्यांसह पांढरा रंग असतो, पाय मजबूत आणि केशरी रंगाचे असतात. त्यांची लांबी ६८ ते ७८ सेमी आणि पंखांची लांबी १४० ते १६० सेमी आहे. राजहंस पक्षी हिमालय पर्वतावरून म्हणजेच २८ हजार फूट उंचीवरून उडणारे पक्षी आहेत. पाच-सात वर्षांपासून या तलावावर रंगीत करकोचा, हे एक-दोनच्या संख्येत यायचे. त्यानंतर त्यांच्यासोबतच राजहंसासारखे इतर विदेशी प्रवासी पक्षी येऊ लागले. मात्र आधी ते एक दोनच्या संख्येने यायचे. आता हळूहळू त्यांची संख्या वाढून १३-१४ एवढी झालेली आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा