मुंबई (Mumbai), २८ नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला. दरम्यान तपासाअंती अंबोली पोलिसांनी शितल चव्हाण नावाच्या महिलेला ताब्यात घेतले आहे.
महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास धमकीचा फोन आला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट सुरू असून हत्याराची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी कसून तपास सुरु केला. अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेच्या विचारपूस दरम्यान कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असलेल्या महिलेने हा फोन केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. या महिलेच वय 34 वर्ष असल्याच समजतंय.
दरम्यान, पंतप्रधानांना याआधीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. समाज माध्यमावर हातात तलवार घेऊन त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी समाज माध्यमावर देण्यात आली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.