श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

0

 

शेगाव- विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी आज शुक्रवारी सकाळी पंढरपूरसाठी रवाना झाली. अश्व, ५०० पताकाधारी वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले असून, पायदळ वारीचे हे ५४ वे वर्ष आहे. गण गण गणात बोते आणि हरिनामाचा गजर करत अतिशय भक्तिमय वातावरणात ही पालखी निघाली आहे. पालखीला सर करण्यासाठी हजारो भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले होते. सकाळी मंदिरात श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा पार पडल्यानंतर ही पालखी मार्गस्थ झाली. नागझरी रोडवरील युवराज देशमुख यांच्या मळ्यात चहापाण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ‘श्रीं’ची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. ही पालखी नागझरी मार्गे जाणार असून मुक्काम पारस येथे राहणार आहे, त्यानंतर निमकर्दा, गायगाव, भोरद मार्गे पालखी अकोला शहरात दाखल होणार आहे. अकोला येथे पालखीचा २ दिवस मुक्काम असून तिथून पुढे वाडेगांव मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे, २७ जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार असून २७ जून ते २ जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम राहणार आहे. तर ३ जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे. २३ जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर २४ जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी माहेरी म्हणजेच शेगावी पोहोचणार आहे.