मुंबईः 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व शिंदे गटातही जागावाटपाची प्राथमिक चर्चा सुरु आहे. या चर्चेत शिंदे गटाकडून २३ पैकी २२ जागांवर दावा सांगण्यात आल्याचे (Shinde Group claims 22 LS Seats) सूत्रांनी सांगितले. शिवसेनेने २०१९ मध्ये २३ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी २२ जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे.त्यामुळे आता त्यावर भाजपकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत घटक पक्षांमधील जागावाटपाची चर्चा तुर्तात थांबलेली आहे. सध्या या पक्षांमध्ये मोठा भाऊ कोण, यावर वाद सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिंदे गटाने २२ जागांवर दावा सांगितला आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. सध्या शिंदे गटाकडे १३ विद्यमान खासदार आहेत. या जागा पुन्हा जिंकण्यासाठी काय करावे लागेल, यावरही चर्चा झाली. लोकसभेच्या या 13 जागांसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी संबंधित मतदारसंघांमधील भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची बैठक होतील, असेही सांगण्यात आले आहे. सध्या उद्धव ठाकरे गटाकडे केवळ सहा खासदार उरलेले आहेत.