देशमुख एसीबी कार्यालयात चौकशीसाठी

0

अकोला (Akola) : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हे आज अमरावतीच्या एसीबी (ACB)च्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करुन ते एसीबी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. अकोल्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावती येथे रवाना झाले आहेत. अमरावतीत आमदार देशमुख हे शिंदे गटाबाबत खुलासा करणार असून कथित तक्रारदाराचं आणि मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्याला अटक होण्याच्या तयारीनीच ते घरुन निघाले असून सोबत त्यांनी कपड्यांची पिशवीही घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असून आम्ही कोणत्याही कारवाईसाठी तयार आहोत, असे नितीन देशमुख यांनी सांगितले.


आमदार देशमुख यांच्याकडे कंपनी, कारखाने, यासह अनेक शेत-जमिनी असल्याचा आरोप करणारी तक्रार अकोल्यातील एका व्यक्तीने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दिली आहे. अमरावतीच्या एसीबीच्या पथकाने बाळापूर परिसरात पाहणी करून देशमुख यांच्या संदर्भात चौकशी केली असल्याची माहिती आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) आणि एका तक्रारदाराच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण एसीबीला तक्रारदार संदर्भात माहिती मागितली असून तक्रारदार तोच आहे असे निष्पन्न झाल्यास मुख्यमंत्री अन् त्या व्यक्तीची ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर ठेवली जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. आपल्याविरुद्ध कारस्थान रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.