नागपूरः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी “भाजपा आणि नैतिकता यांचा काही संबंध आहे, असे मला वाटत नाही”, अशी टीका केली होती. आता त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना उत्तर दिले आहे. यासंबंधी प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, “शरद पवारांचा नैतिकतेशी काही संबंध आहे का? आता जर शरद पवारांनी भाजपाला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच होईल. मग इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे गेले इथून सुरुवात होईल. त्यामुळे जाऊ द्या. ते ज्येष्ठ नेते आहेत. बोलत असतात. इतके लक्ष द्यायचे नसते”, या शब्दात फडणवीस यांनी पवारांचा समाचार घेतला.
ठाकरे गटाचाही समाचार
यावेळी फडणवीस यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला. “नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकारच नाही. जे मोदींचे फोटो लावून निवडून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचारही सोडला, युती सोडली, पक्षही सोडला ते कोणत्या नाकाने नैतिकता सांगतात, ते मला समजतच नाही. निकाल त्यांच्या बाजूने आला, असे ते म्हणत असतील तर त्यांनी ढोल बडवावेत” असा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्ष दबावात येणार नाहीत
विधानसभेच्या अध्यक्षांनी अपात्रता प्रकरणावर १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून सुरु आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने या संदर्भातील सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. हा अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. ते मुक्त आणि न्याय्य अशा प्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडतील, असे वाटत नाही. ते स्वतः वकील आहेत. त्यामुळे कायद्यानुसारच सुनावणी करून निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले.