वीज बिलापासून मुक्ती देणाऱ्या रूफटॉप

0

सोलर योजनेला ग्राहकांची मोठी पसंती

नागपूर,दि.१२ मे २०२३: घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त वीज निर्मिती झाली तर ती महावितरणला विकायची या रूफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून नागपूर परिमंडलात ५८३१ ग्राहकांकडून एकूण ६६ मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे.या ग्राहकांना वीजबिलांपासून मुक्त मिळाली आहे.या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येकघरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते.यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे.

महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होते. तसेच नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते.त्यामुळे वीज ग्राहकांसाठी फायद्याची असणाऱ्या व पर्यावरणला हातभार लावणाऱ्या या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नागपूर परिमंडला चे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.