अरे देवा! मंदिरातच दुहेरी खून भद्रावतीच्या मांगली गावातील थरार : अवघा जिल्हा हादरला

0

चंद्रपूर. गेल्या काही काळात चंद्रपुरात चोरी आणि त्यामुळे होणाऱ्या हत्यांचे सत्र वाढले आहे. आता चक्क मंदिरातच दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली गावात (Mangli Village in Bhadravati Taluka of Chandrapur District ) जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून (double murder ) झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आली. यामुळे गावात भीतीचे वातावरण असून या घटनेने अवघा जिल्हा हादरला आहे. दोन्ही मृतक शेतकरी असून त्यांच्याशी कुणाचेही वैमनस्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंदिरातील दानपेटी फोडलेल्या अवस्थेत (Donation box in the temple was found broken ) आहे. यावरून दानपेटी फोडण्यासाठी आलेल्यांनी त्यांची हत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. मारेकऱ्यांना तातडीने हुडकून काढण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातच गुन्हेगारीचा ग्राफ वाढता आहे. गंभीर स्वरूपाच्या घटना सातत्याने पुढे येत असतानाच मंदिरांमध्येही कुणी सुरक्षित नसल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.
मधुकर खुजे आणि बाबुराव खारकर अशी मृतकांची नावे असून ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. जवळच त्यांची शेती आहे. शेतीलगतच जगन्नाथ महाराजांचे मठ मंदिर आहे. वन्यप्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी म्हणून रोज रात्री शेतात जागलीला जातात. मंदिर लागून असल्याने तिथे विसावा घेतात. नेहमीप्रमाणेच काल रात्रीही ते शेतात गेले होते. अनेकजण सकाळीच नित्यनेमाने मंदिरात दर्शनासाठी येतात. सकाळी दर्शनासाठी आलेल्यांना दोघांचेही मृतदेह नंदीजवळ रक्तात्या थारोळ्यात पडून दिसले. अगदी वाऱ्याच्या वेगाने गावात ही वार्ता पसरली. अवघा गाव घटनास्थळी लोटला. मंदिरातील दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर फोडलेल्या स्थितीत आढळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे. श्वनपथकाकरवी आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या घटनेने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुण वर्गात रोषही दिसून येत आहे. मारेकऱ्यांना हुडकून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.