राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमच्या समुद्रातील अतिक्रमण काही तासांतच भुईसपाट

0

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत कबरीचे बांधकाम झाल्याच्या एक व्हिडीओ दाखवला होता. बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी आम्ही गणपती मंदीर बांधू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला होता. या भाषणानंतर काही तासातच मुंबई महापालिकेने कारवाई करीत अतिक्रमण भुईसपाट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. बुधवारी रात्रीच निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी (मुंबई शहर) हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. यासाठी सहा अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, मशिदींवरील भोंग्याचा मुद्दाही राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. आता सरकार त्यावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागलेले आहे.
गुरुवारी सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे पथक बुलडोझरसह याठिकाणी पोहोचले होते. या कारवाईमुळे कुठलाही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी काल रात्रीपासूनच या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राज काय म्हणाले
मनसेच्या गुढीपाडवा कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. मशिदीवरील भोंगे पुन्हा सुरु झाले असून शिंदे-फडणवीस सरकारने ते उतरवावे किंवा मग आमच्याकडे दुर्लक्ष करावे, अशी मागणी त्यांनी केली. हा मुद्दा आपण सोडलेला नाही, असे सांगून राज ठाकरे यांनी मागील सरकारने मनसेच्या 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. ते गुन्हे मागे घ्या, अशी मागणीही त्यांनी केली. आता या मुद्यावर सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा