मराठीतील विख्यात कथाकार, कादंबरीकार, समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे यांच्या लेखनाला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने डॉ. रवींद्र शोभणे मित्रपरिवारातर्फे शनिवार, दि. १८ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वा. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात त्यांचा जाहीर सत्कार आणि त्यांच्या लेखनप्रवासाच्या निमित्ताने त्यांची प्रकट मुलाखत आयोजित केली आहे. डॉ.रवींद्र शोभणे यांची ‘प्रवाह’ ही पहिली कादंबरी १९८३ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदान योजनेत प्रकाशित झाली होती. या कादंबरीने त्यांना मराठी साहित्यात कादंबरीकार म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी आजवर अकरा कादंबऱ्यांसह एकूण तीस पुस्तकांची निर्मिती केली. लेखनचाळीशीप्रीत्यर्थ डॉ. रवींद्र शोभणे यांचा मराठीतील अग्रगण्य कथाकार, कादंबरीकार आणि माजी संमेलनाध्यक्ष श्री. भारत सासणे यांच्या हस्ते सत्कार होणार असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री.प्रदीप दाते उपस्थित राहतील. या औपचारिक सत्कार समारंभानंतर लागलीच डॉ. राजेंद्र सलालकर आणि डॉ.अजय कुलकर्णी हे अभ्यासक त्यांची मुलाखत घेतील. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी बहुसंख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे विनम्र आवाहन डॉ. रवींद्र शोभणे मित्रपरिवारातर्फे करण्यात आले आहे.