ठिकठिकाणी झाडांवर विद्युत रोषणाई, चौकाचौकात झळकले विविध देशांचे ध्वज
नागपूर- काही दिवसांवर आलेल्या जी-20 या जागतिक परिषदेसाठी नागपूर शहर सज्ज झाले आहे. शहराच्या सिव्हिल लाईन्स परिसरात ठिकठिकाणी जी-20 परिषदेच्या सदस्य देशांचे ध्वज दिमाखात फडकत असून झाडांवर विद्युत रोषणाईने क्षणभर आपण नागपुरात आहोत की परदेशात असे वाटत आहे. झिरो माईल परिसर चकाकला आहे. विमानतळ ते वर्धा रोडमार्गे सिव्हील लाईन्स परिसर रंगलेल्या भिंती, आकर्षक सजावट, लोककला,आदिवासी संस्कृती, विदर्भातील सांस्कृतिक ठेवा असे सारेकाही नागपूरकराना या भव्यदिव्य आयोजनाची महती सांगत आहे. दरम्यान,ढगाळ वातावरण, जोरदार पावसाच्या हवामान खात्याच्या इशाऱ्याने काहीशी चिंता वाढविली आहे.
महत्वाची शासकीय कार्यालये असणाऱ्या सिव्हिल लाईन्स परिसरात सौदर्यीकरणाची विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत. जी-20 परिषदेच्या सदस्य देशांच्या ध्वजांनी या परिसरास वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या दुभाजकावर पथदिव्यांच्या खाबांवर तसेच सी-20 परिषदेच्या प्रतिनिधींचे स्वागत करणारे ध्वज लावण्यात आले आहेत.
जीपीओ चौकापासून देवगिरी चौक, भोले पेट्रोलपंप, उच्च न्यायालय आणि विधानभवनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आलेले हे ध्वज पादचारी आणि वाहनाने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. जीपीओ आणि विधानभवन चौकात उभारण्यात आलेले आकर्षक ग्लोसाईन बोर्डही आकर्षणाचा विषय ठरले आहे. रात्रीच्या वेळी नागपूरकर सेल्फी काढताना दिसत आहेत.
नागपूर -वर्धा रोडवरील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान विदर्भातील आदिवासी व त्यांची गौरवशाली परंपरा दर्शविणारे देखावे लावण्यात आल्याने या परिसरास देखणे स्वरुप प्राप्त झाले आहे. उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान आदिवासींचे लोकजीवन व समृद्ध परंपरा दर्शविणारे धातुंचे आकर्षक देखावे उभारण्यात आले.
छत्रपती चौक मेट्रो स्टेशन मार्गीकेच्या पीलर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा देखावा बसविण्यात आला आहे. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन पीलर दरम्यान पेंच अभयारण्य व प्रकल्पातील प्राणी, मोगली हे प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिकेतील पात्र व जैव संपदा साकारण्यात आली आहे. 000 पाहुणे नागपुरात घेणार व-हाडी खाद्यपदार्थांचा आस्वाद या परिषदेसाठी येणा-या पाहुण्यांसाठी खास व-हाडी खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
21 मार्च रोजी फुटाळा तलाव येथे फाऊंटन शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या शोनंतर तेलंगखेडी गार्डनमध्ये व-हाडी भोजनाचा आस्वाद जी-20 परिषदेचे पाहुणे घेणार आहेत. यात विदर्भातील विविध भागातील प्रसिद्ध असणा-या व्यंजनांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. 22 मार्चला दिवसभर नागरी परिषदेच्या चर्चासत्र, परिसंवादानंतर सायंकाळी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.00000 भारतीय परंपरेने होणार सी-20 सदस्यांचे नागपुरात स्वागत
जी-20 परिषदेअंतर्गत सिव्हील सोसायटी अर्थात सी-20 च्या प्रारंभीक परिषदेचे आयोजन शहरात 20 ते 22 मार्च दरम्यान करण्यात आले आहे. देश-विदेशातील पाहुण्यांचे स्वागत भारतीय परंपरेनुसार करण्यात येणार आहे. या आयोजनासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी ,जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार आदी वरिष्ठ अधिकारी आयोजनाची पूर्वतयारी पहात आहेत. 000 विमानतळावर विशेष कक्ष
विमानतळावर पाहुण्यांसाठी विशेष स्वागत कक्ष उभारण्यात येत आहे. भारतीय परंपरेनुसार पाहुण्यांना फेटा बांधण्यात येईल तसेच महिलांना नऊवारी साडी नेसवून मेहंदी लावण्यात येईल. पाहुण्यांना टिळा लावून ओवळण्यात येईल व सेवाग्राम येथील सुतमाला घालून त्यांचे स्वागत करण्यात येईल. यावेळी स्वागतपर असे शहनाईचे वादन देखील करण्यात येणार आहे. पाहुण्यांना विमानतळ ते वाहनापर्यंत विद्यार्थ्यांची टिम नृत्य करत घेवून जाईल. नियोजित राहण्याच्या ठिकाणी पोहचल्यावर हॉटेलच्या गेटपासून आतपर्यंत विद्यार्थ्यांची लेझीम टीम त्यांना वाजतगाजत घेवून जाणार आहे.
पाहुण्यांसाठी देशनिहाय संपर्क अधिकारी नेमण्यात येणार असून भाषेची अडचण होऊ नये म्हणून विद्यापीठाचे विद्यार्थी त्यांचेसोबत राहून दुभाषकाचे काम करतील.
0000 शहरात ठिकठिकाणी सौंदर्यीकरण जोरात अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौकादरम्यान वैविध्यपूर्ण वृक्ष लागवड सुरू आहे. यासोबतच डेकोरेटिव्ह पोल लाईट्स उभारणीला गती आली आहे.
सीताबर्डीकडून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौकादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वैविद्यपूर्ण वृक्ष लागवड होत आहे. याठिकाणी आलामंगा, ट्रावलर्स पाम, मुसंडा, सरेका पाम, वेरिगेटेड बांबू, क्रोटोन पेट्रा, ओडोलोम अशा एकूण 16 प्रजातींचे आकर्षक व डौलदार फुलांनी लदबदलेली झाडे लावण्यात येत आहेत. याभागात विशिष्ट प्रकारचे लँडस्केपिंग करुन लॉन लावण्यात आली आहे. याबरोबरच जे.पी. चौक, रॅडिसन ब्लु हॉटेल परिसर विमानतळ चौक ते सोनेगांव पोलीस स्टेशन दरम्यानही डेकोरेटिव्ह पोल लाईट्स लावण्यात आले आहेत.
अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौकादरम्यान रस्त्याच्या दुभाजकावर ग्लोसाईन पॅनल उभारण्यात आले आहेत. तसेच अजनी बसस्टँड सेंल्टरवर सी-20 परिषदेविषयीचे माहिती देणारे फलकही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. एकंदरीत या सौंदर्यीकरणामुळे नागपूर शहराला देखणे रुप प्राप्त झाले आहे.
यासंदर्भातील पूर्वतयारीचा एक भाग म्हणून प्रत्येक देशाच्या राष्ट्र भाषेप्रमाणे भाषाशैली, उत्तम पोशाख, ध्वजवाहक व देशांचे नामफलक यांचा उत्तम समन्वय साधत नागपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांनी नुकतेच जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात अभिरुप जी-20 संमेलनाच्या माध्यमातून विश्वरुप साकार केले. भारताचे प्रधानमंत्री, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच युरोपीयन युनियनच्या अध्यक्षांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मन जिंकली. नागपूर शहरातील वॉकर स्ट्रीटवर येणाऱ्या नागरिकांचे विविध भाव दर्शविणारे 11 ‘स्टॅचू’ साकारलेल्या ‘वॉकर पॅराडाईज’चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झाले.याचीही भर शहराच्या सोंदर्यात यानिमित्तानं पडली. मुख्यमंत्री निवास ‘रामगिरी’ पुढील मार्गावर (वॉकर स्ट्रीट) नागपूर महानगरपालिका, ग्रीन फाऊंडेशन, जयस्वाल निको ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हे ‘वॉकर पॅराडाईज’ साकारण्यात आले आहे. शहरातील विविध भागातून ‘वॉकर स्ट्रीट’वर फिरायला येणाऱ्या नागपूरकरांचे भाव पुतळे रूपात साकारण्यात आले आहेत. सर्वाधिक नागरिक या मार्गावर ‘मॉर्निंग वॉक’साठी येत असल्याने ग्रीन फाऊंडेशनद्वारे येथे ‘वॉकर पॅराडाईज’ साकारण्याची ही संकल्पना पुढे आली. 0000 असा आहे परिषदेचा कार्यक्रम
सी-20 परिषदेसाठी 19 मार्च रोजी सायंकाळपासून परदेशी व भारतीय प्रतिनिधींचे शहरात आगमन होणार आहे. 20 मार्च रोजी दुपारी 3.30 वा. रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
‘नागरी संस्थांची शाश्वत विकासातील भूमिका, जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय’ बाबत या परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. सलग दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या समारोपास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.