आधार कार्ड आता विनाशुल्क अपडेट करता येणार

0

नवी दिल्ली : आधार कार्ड हे देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे ओळखपत्र आहे. त्यामुळे ते दर काही वर्षांनी अपडेट करावे लागते. त्यासाठी काही शुल्कही द्यावे लागते. मात्र, आता यासंदर्भात सरकारने दिलासा दिलाय. आधारकार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. युआयडीएआय ने आधार अपडेट करण्याचे शुल्क रद्द केले आहे. मात्र, ही सुविधा केवळ आधारकार्ड ऑनलाईन अपडेट करणाऱ्यांसाठीच आहे. तुम्हाला आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. (Aadhaar Card Update). मात्र, ते कार्यालयात जाऊन अपडेट करायचे झाल्यास त्यासाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. आधारधारकांना तीन महिन्यांसाठी या मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ घेता येणार असून आधार कार्डधारक 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 कालावधित त्यांचे आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करु शकतात. विशेष म्हणजे आधार-पॅन कार्ड लिंक करणे देखील अनिवार्य असून त्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.

आधारकार्डमध्ये ज्यांनी मागील दहा वर्षांपासून कोणतेही बदल केलेले नाहीत, त्यांनी ते अपडेट करून घेणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे. ऑनलाईन अपडेटसाठी आधार कार्ड धारक त्यांच्या आधार क्रमांकाद्वारे https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करु शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जातो. यानंतर स्वयंसेवा डॉक्यूमेंट अपडेटवर क्लिक करून माहिती अपडेट करता येणार आहे. आधार कार्ड ऑफलाईन पद्धतीने अपडेट करायचे असेल तर त्यासाठी आधार सेंटरवर जाऊन ठराविक शुल्क भरुन ते अपडेट करता येणार आहे.