बुटीबोरी येथे कर्मचारी राज्य विमा रुग्णालयासाठी १९४ कोटीचा निधी – केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची माहिती

0

 

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असणाऱ्या बुटीबोरी येथे कर्मचारी राज्य विमा रुग्णालयाच्या बांधकामासाठी १९४ कोटीचा निधी देण्यात आला असून बांधकामाला सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती देणारे पत्र केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविले आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून बुटीबोरी येथील राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या २०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी देऊन लवकरात लवकर काम सुरू करावे अशी विनंती केली होती. यादव यांनी या पत्रात म्हटले आहे की, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या २०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचे कंत्राट उत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगम (UPRNNL) या कंपनीला देण्यात आले असून त्यासाठी १९४.९३ कोटीचा अंदाजित खर्चाला १४ फेब्रुवारी २०२० रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर २६ मे २०२२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कडून परवानगी व बुटीबोरी नगर परिषदेचे अनुमोदन प्राप्त झाले आहे.
सद्यस्थितीत रुग्णालयाच्या बांधकाम स्थळी खोदकाम अंतिम टप्प्यावर आले आहे तर लवकरात लवकर पीसीसी व फुटिंगचे कार्य सुरू करण्याचे निर्देश मंत्रालयाकडून देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. या रुग्णालयामुळे बुटीबोरी औद्योगिक परिसरातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना रुग्ण व आरोग्य सेवा मिळणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती आ. बावनकुळे यांनी दिली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा