अकोला कारागृहासमोर घटना, सुदैवाने अनर्थ टळला
अकोला. पेट्रोल- डिझेल इंधनाने भरलेला टँकर (petrol-diesel tanker) शहरातील कारागृहासमोर उड्डाणपुलावर २०० फूट वर चढला आणि अचानक चालकाला हृदयविकाराचा झटका (driver has heart attack ) आला. चालक बेशुद्ध झाल्याने अनियंत्रित टँकर (Tanker uncontrolled ) वेगाने उताराच्या दिशेने आला आणि दुभाजकावर धडकून अडकला. ट्रकच्या मागे एकही वाहन नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. शिवाय ट्रक थांबल्याने मोठा धोकाही टळला अन्यथा इंधनाचा भडका उडण्यी शक्यता होती. या घटनेनंतर चालकाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले. माणिकराव रामराव महिंद्रे (वय ५५, रा. रविनगर, अमरावती) असे मृतक चालकाचे नाव आहे. गेले काही दिवस रस्ते अपघाताच्या घटना सातत्याने घडत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
माणिकराव महिंद्रे हे टँकर घेऊन (क्र. एमएच २७ एक्स ५१३४) गायगाव येथे गेले. सहा हजार लिटर पेट्रोल व सहा हजार लिटर डिझेल या टँकरमध्ये भरून अमरावतीच्या दिशेने ते गुरुवारी दुपारी निघाले होते. अकोला शहरातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलावरून दर्यापूर मार्गे ते अमरावती गाठणार होते. उड्डाणपुलावर टँकर चढत असताना २०० फूट वर गेला. त्याच वेळी अचानक माणिकराव महिंद्रे यांना हृयविकाराचा झटका आला. त्यामुळे टँकर अनियंत्रित होऊन वेगाने मागे घेऊन दुभाजकावर आदळला. टँकर पूर्ण इंधनाने भरला होता. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ऑटोचालकांनी टँकर चालक यांना सर्वोपचार रुग्णालयात नेले. तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
अलीकडच्या मार्गावर रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. वाहनांचा वेग जीवघेणा ठरतो आहे. त्यातच चालकांची अचानक प्रकृती ढासळून होणारे अपघातही वारंवार पुढे येत आहे. यापूर्वी चक्क प्रवाशांनी भरलेल्या एसटीचाचालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूलबसच्या चालकालाही ऐन वानह चालवितानाच हृदय विकाराचा झटका आल्याच्या घटना घडल्या होत्या.