दोन गटातील वादातून १९ वर्षीय तरुणाचा खून, नागपुरातील घटना

0

नागपूर : घरसमोर वाहन पार्क करण्यावरून दोन गटात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन झालेल्या हाणामारीत एका अठरा वर्षीय तरुणाचा खून (Murder In Nagpur City) झाल्याची घटना यशोधरानगर परिसरात गुरुवारी रात्री घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव योगेश धामने असे असून तो इंदिरा गांधीनगर परिसरातील रहिवासी होता. या घटनेत रामभाऊ शाहू व मोनू असे दोघे जण गंभीर जखमी आहेत. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी रामभाऊ शाहू आणि योगेश धामने यांचा मोनू रायतदार, सुदामा आणि त्यांचा काका नंदनलाल रायतदार यांच्यात वाद झाला होता. हा वाद वाहन पार्क करण्यावरून झाला होता. त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर योगेश हा रामभाऊ शाहू यांच्या घरी आला. ते दोघेही बाहेर उभे असताना, मोनू आणि योगेशमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून रामभाऊ यांनी मोनूला मारहाण सुरु केली. आवाज ऐकून नंदलाल आणि सुदामा आले व त्यांनी चाकू, दंडा आणि लोखंडी रॉडने योगेशला मागण्यास सुरुवात केली. या मारहाणीत योगेशचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत रामभाऊ शाहू आणि मोनू गंभीर जखमी झाल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी मोनू बन्सीलाल रायतदार सुदामा बन्सीलाल रायतदार आणि नंदलाल रायतदार या आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा