नागपूर. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhshradha nirmulan samete) आक्षेप घेतलेले धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj ) यांच्या समर्थनार्थ नागपुरात आज विश्व हिंदू परिषदेतर्फे (Vishwa Hindu Parishad) आंदोलन करण्यात आले. धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांच्या रामकथा प्रवचनाच्या निमित्ताने नागपुरात आले होते व तेथे त्यांनी ‘दरबार’ भरवून दिव्य चमत्कार करण्याचा दावा केला होता. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत ही बाब जादूटोणा कायद्याचा भंग करणारी असल्याने बाबा विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली होती. सोबतच दिव्यस्व सिद्ध करा आणि 30 लाख रुपये मिळवा, असे आव्हानही दिले होते. मात्र, महाराजांनी ते न स्वीकारताच नागपूर सोडले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण महाराजांनी पळ काढल्याचा दावा केला होता. ते सातत्याने धीरेंद्र महाराज यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप करीत आहेत. चमत्काराची पोलखोल करणारे व्याख्यान दिले होते. त्यानंतर आज विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन करण्यात आले.
अनिसने महाराजांना आव्हान दिल्याने विश्व हिंदू परिषद मैदानात उतरली. अन्य हिंदूत्ववादी संघटनांचेही कार्यकर्त्यांनीही विहिंपच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. शुक्रवारी दुपारी २.३० पासून विहिपचे कार्यकर्ते संविधान चौकात एकत्र आहे. अंनिसच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि श्याम मानव धीरेंद्र कृष्ण महाराज यांना बदनाम करीत असल्याचा दावा केला. या आंदोलनात अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. विश्व हिंदू परिषदेचे धर्म प्रसार प्रमुख राजकुमार शर्मा, भैय्या चौबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अनिस व श्याम मानव यांचा निषेध करणाऱ्या व बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. हिंदू महंतांचा अपमान सहन केल जाणार नाही, जसास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. दोन्ही बाजूने सुरू असलेले दावे- प्रतिदावे बघता हे प्रकरण नजिकच्या काळात तरी शांत होताना दिसत नाही.