बीड : शेतातील वीज कापल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने सोशल मिडियावर स्वतःला लाईव्ह करीत विष घेतल्याची धक्कादायक घटना मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथे घडली. नारायण वाघमोडे असे या शेतकऱ्याचे नाव (Suicide attempt by farmer) आहे. हा प्रकार लक्षात येताच गावातील तरुणांनी धावपळ करून वाघमोडे यांचे घर गाठले व त्यांना बीडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महावितरणच्या एका कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी विष घेतल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून त्या कर्मचाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
रब्बीच्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरु असतानाच महावितरणकडून कनेक्शन बंद करण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्याने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करत विष प्राशन केले, असे सूत्रांनी सांगितले. खरीपाचे पीक अतिवृष्टीमुळे खराब झाल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकापासून मोठ्या आशा आहेत. आता रब्बीची लागवड झाली असताना महावितरणकडून थकीत वीज बिलापोटी सक्तीची कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे सक्तीची वीज बिल वसुली न करता, कोणत्याही शेतकऱ्याचे थेट वीज कनेक्शन खंडीत करू नयेत असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र, तरीही वीज बिल वसुली सुरु असल्याची ओरड सुरु आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातच राज्य सरकारने सक्तीची वीज वसुली होणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाची महावितरणकडून चौकशी होणार असल्याचे कळते.