रत्नागिरीः शिवसेनेचे वरीष्ठ नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. (ED action against Sadanand Kadam) दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने कदम यांना अटक केली असून त्यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झालेय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती जाहीर केलीय. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमां यांच्या अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. त्यामुळे रामदास कदम हे या प्रकरणी काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचे नसून सदानंद कदम यांचे असल्याचा दावा अलिकडेच राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता. साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचे प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या वर्षभरापासून गाजत आहे. या प्रकरणात पूर्वी अनिल परब यांचेही नाव आले होते. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती. या प्रकरणात सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, काही होण्यापूर्वीच ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये झालेली सभा यशस्वी होण्यामागे सदानंद कदम यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय.