मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील वाद संपण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. नाशिक पदवीधीर निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर नेते यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असतानाच आता पटोलेविरोधक पुन्हा एकदा सक्रीय झाले (Maharashtra Congress President Nana Patole) आहेत. पटोले यांच्या विरोधात असलेले प्रदेशाचे २२ पदाधिकारी पुन्हा एकदा हायकमांडची भेट घेऊन गाऱ्हाणी मांडणार आहेत. पटोलेविरोधी गट यासाठी दिल्लीला रवाना झाला असून त्यात काँग्रेसचे दोन माजी खासदार व चार माजी आमदारांचा समावेश आहे. मराठवाड्यातील पटोले यांच्याविरोधातील असंतुष्ट गट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वरीष्ठ नेते के.सी. वेणूगोपाल यांची दिल्ली दरबारी भेट घेणार आहेत. प्रदेशाध्यक्षपदावरून पटोले यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी या गटाकडून केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील अनेक नेते पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराज आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत त्याची झलक बघायला मिळाली होती. काँग्रेसचे निलंबित नेते व अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारी वरून काँग्रेस पक्षात घमासान बघायला मिळाले. तांबे यांनी बंडखोरी केल्यावर त्यांच्यावर पक्षाने तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. तांबे अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असा संघर्ष बघायला मिळाला. थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने थोरात यांची समजूत काढल्यावर हा संघर्ष तेवढ्यापुरता शमला. आता पुन्हा पटोले विरोधी गट सक्रीय होत आहे.