राज्यात लव्ह जिहादची एक लाखांवर प्रकरणे, महिला व बालविकास मंत्र्यांचा दावा

0

मुंबई: “महाराष्ट्रात लव्ह जिहादची एक लाखांपेक्षा जास्त प्रकरणे उघडकीस आली असल्याचा दावा राज्याचे महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केलाय. लव्ह जिहाद आणि महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावर राज्यात मोठ्या संख्येने मोर्चे निघत असताना राज्यात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये, ही सरकारची जबाबदारी असल्याचे लोढा यांनी सांगितले. (Love Jihad Cases in Maharashtra) आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लोढा यांनी हा दावा केलाय. जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती मिळाली होती, असेही त्यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री लोढा म्हणाले, आपण महिला सुरक्षा, सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो. पण लव्ह जिहाद तसेच महिलांवरील अत्याचार या मुद्द्यावर राज्यभरात मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणे समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. महाराष्ट्रात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे. इंटरफेथ मॅरिज कमिटीबाबत मी बोलू इच्छित नाही. जीआरमध्ये एकही शब्द असा नाही जो एखाद्याच्या धर्म किंवा लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करेल.

लग्नानंतर ज्या मुलीचा आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क तुटला आहे, तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न महिला बालविकास विभाग करेल, असे ते म्हणाले. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एका समितीची घोषणा केली होती. जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती मिळाली होती. समितीचे नाव प्रसिद्ध झाल्यानंतर काही कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. बहुतांश प्रकरणांमधील सदस्यांनी सांगितले की, त्यांचा त्यांच्या मुलांशी संवाद तुटला आहे. त्यांना संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची किंवा समुपदेशन घेण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा